मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच सत्ता हस्तगत केल्यानंतर भाजपचा महापौर बुधवारी विराजमान झाला. रितू तावडे यांची अधिकृतरित्या महापौरपदी निवड झाली. प्रशासक राजवटीचा अध्याय संपुष्टात येत लोकप्रतिनिधींच्या हाती पुन्हा कारभार सोपवला गेला. मात्र, सत्तारोहणाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात घोषणांच्या गजरात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भाजपच्या नगरसेवकांनी सकाळी हुतात्मा चौक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केले. त्यानंतर महायुतीचे नगरसेवक महापालिका मुख्यालयात दाखल झाले. सभागृहात प्रवेश करताच शंखनाद आणि घोषणांचा गजर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे सत्ताधाऱ्यांच्या बाकांवर उत्साह ओसंडून वाहत होता.
भाजप नगरसेवकांकडून ‘जय श्रीराम’ आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणा सुरू झाल्या. त्यास प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी ‘चोर है’च्या घोषणा दिल्या. काही काळ घोषणांचा हा आवाज चढत गेला. त्यानंतर भाजपकडून ‘देवाभाऊ-देवाभाऊ’ असा जयघोष सुरू करण्यात आला. त्या घोषणांवर ठाकरे गटाने ‘ठाकरे-ठाकरे’चा नारा दिला. सभागृहातील हा घोषणांचा संघर्ष काही काळ सुरू राहिला. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम गॅलरीतून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
यानंतर रितू तावडे यांनी महापौरपदाची, तर शिवसेनेचे (शिंदे गट) संजय घाडी यांनी उपमहापौरपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते.
महापौरपद स्वीकारल्यानंतर तावडे यांनी लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा संकल्प व्यक्त केला. “मुंबईच्या विकासासाठी समन्वयाने काम करू,” असे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तावडे यांचे अभिनंदन करताना, “अनुभवी आणि ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. महानगरपालिकेतून मुंबईच्या विकासाचा कार्यक्रम गतीने राबवला जाईल,” असे सांगितले.
दरम्यान, निवडणुकीतील निकालानुसार भाजप ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. ठाकरे गटाला ६५, शिवसेना (शिंदे गट) २९, काँग्रेस २४, एमआयएम ८, मनसे ६, राष्ट्रवादी काँग्रेस ३, समाजवादी पक्ष २ आणि इतरांना प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. स्पष्ट बहुमत नसतानाही महायुतीने सत्ता स्थापन केली आहे.
सभागृहातील पहिल्याच दिवशीची घोषणाबाजी आगामी काळातील राजकीय संघर्षाची झलक देऊन गेली आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील तणावपूर्ण वातावरणात पालिकेचा कारभार कसा रुळावर येतो, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.


