मुंबई प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्यभरात अपघाताबाबत विविध शंका आणि तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन अपघाताच्या दिवशी घडलेल्या घटनांचा सविस्तर घटनाक्रम मांडला. मुंबईहून बारामतीपर्यंतचा विमानप्रवास, वापरण्यात आलेले विमान, संबंधित कंपनी, तसेच अपघातानंतर उपस्थित झालेले प्रश्न त्यांनी आकडेवारी आणि तपशीलांसह समोर ठेवले.
रोहित पवार यांनी सांगितले की, अपघाताच्या दिवशी सकाळी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. सुमारे २१० किलोमीटरचा हा प्रवास अवघ्या २७ मिनिटांत पूर्ण होणार होता. यासाठी ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीचे लेअरजेट-४५ प्रकारचे खासगी विमान वापरण्यात आले होते. हे विमान अमेरिकेतील बॉम्बार्डियर कंपनीने २०१० साली तयार केलेले असून, ते ५१ हजार फूट उंचीपर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे.
टेक-ऑफपासून अपघातापर्यंतचा घटनाक्रम
रोहित पवार यांच्या माहितीनुसार, सकाळी ७ वाजून २ मिनिटांनी विमानाचे क्रू मेंबर्स विमानाजवळ पोहोचले. कॅप्टनकडून आवश्यक तपासणी करून एटीसीशी संवाद साधण्यात आला. सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी सर्व काही ‘ऑल ओके’ असल्याची माहिती देण्यात आली. त्यावेळी पीएसओ विदीप जाधव उपस्थित होते.
सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी प्रवासी विमानात बसले. ७ वाजून ५६ मिनिटांनी मुंबई एटीसीशी संपर्क साधण्यात आला आणि सकाळी ८ वाजून १० मिनिटे ५१ सेकंदांनी विमानाने उड्डाण केले. ८.२२ वाजता विमान लोणावळ्याजवळ होते, तर ८.२५ वाजता पुणे हद्दीत प्रवेश झाला. यवत, सुपे आणि जळगाव परिसरातून मार्गक्रमण करत असताना सकाळी ८.४३ ते ८.४५ दरम्यान अपघात घडल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.
सकाळी ९ वाजता अजित पवार गंभीर जखमी असून रुग्णालयात जिवंत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती. मात्र काही वेळातच त्यांच्या निधनाची बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
विमान कंपनीवर गंभीर आरोप
रोहित पवार यांनी अपघात अपघाती होता की त्यामागे काही वेगळे कारण आहे, असा थेट सवाल उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, संबंधित व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा २०२३ मध्येही अपघात झाला होता. मात्र त्या अपघाताचा कोणताही अधिकृत अहवाल आजपर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही. त्या वेळी डीजीसीएने अहवाल दडपला का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
युरोपमधील विमानन संस्थांनी या कंपनीचे काही परवाने रद्द केल्याची माहिती देत, तरीही हीच विमाने भारतात कशी उड्डाण करत आहेत, असा सवाल त्यांनी केला. अजित पवार यांच्या निधनानंतरही संबंधित कंपनीवर बंदी का घालण्यात आलेली नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
तांत्रिक बिघाड आणि देखभालीवर प्रश्नचिन्ह
रोहित पवार यांनी असा आरोप केला की, अपघातग्रस्त विमानातील काही वॉर्निंग सिस्टिम्स कार्यरत नव्हत्या. स्टॉल वॉर्निंग सिस्टिम आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर बंद असल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अपघाताच्या वेळी कोणताही वॉर्निंग सिग्नल रेकॉर्ड झाला नसावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
देशात केवळ दोन मोठ्या एमआरओ (मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल) कंपन्या असताना, व्हीएसआर कंपनी स्वतःच आपल्या २७ विमानांची देखभाल करत असल्याने त्यांच्याकडे पुरेसे तांत्रिक तज्ज्ञ होते का, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अपघाताच्या आदल्या दिवसातील घडामोडी
रोहित पवार यांनी अपघाताच्या आदल्या दिवसातील घडामोडींचाही तपशील दिला. २७ जानेवारी रोजी अजित पवार पुण्याला गाडीने जाणार होते. मात्र एका मोठ्या नेत्यासोबत झालेल्या उशिरापर्यंतच्या चर्चेमुळे आणि मंत्रालयातील महत्त्वाच्या फाईलवर सही करण्यासाठी वेळ गेल्याने त्यांचा प्रवास लांबला. अखेर संध्याकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी दुसऱ्या दिवशीसाठी विमान बुक करण्यात आले, असे त्यांनी सांगितले.
चौकशीची मागणी
अपघाताच्या सर्व बाबींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. विमानाचे टेक लॉग, मेंटेनन्स रेकॉर्ड, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि डीजीसीएची भूमिका तपासली जावी, असे ते म्हणाले. “या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय संशय दूर होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.


