मुंबई प्रतिनिधी
फेब्रुवारी–मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. परीक्षाकाळात कोणतेही गैरप्रकार घडू नयेत, यासाठी राज्यभर निर्बंध लागू करण्यात आले असून परीक्षा केंद्रांच्या परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.
बारावीच्या लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीच्या परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यभर ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येत असून परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, दक्षता पथके आणि केंद्रस्तरीय यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात आल्या आहेत. तसेच पालक व शिक्षकांना शिक्षा सूचीची माहिती देण्यात येत आहे.
वसई–विरार शहरातही शिक्षण विभागासोबत पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात कोणतीही गर्दी करण्यास मनाई करण्यात आली असून आदेशांचा भंग झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
परीक्षेदरम्यान कॉपी व गोंधळ टाळण्यासाठी केंद्रांच्या आसपास असलेली सर्व झेरॉक्स सेंटर्स, फॅक्स सेंटर्स आणि एसटीडी बुथ परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात किंवा परिसरात मोबाईल फोन, स्मार्ट वॉच अथवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे.
हे निर्बंध केवळ बाहेरील व्यक्तींना लागू असतील. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित अधिकारी, कर्मचारी, पोलीस पथके, परीक्षार्थी तसेच अंध व अपंग विद्यार्थ्यांसोबत असलेला एक नातेवाईक यांना केंद्रावर उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.


