वृत्तसंस्था:
हरारे : अंडर–१९ विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताच्या वैभव सूर्यवंशीने इंग्लंडविरुद्ध केलेली स्फोटक फलंदाजी क्रिकेट इतिहासात अजरामर ठरली. ८० चेंडूंमध्ये १७५ धावांची खेळी करत वैभवने केवळ सामन्याचं चित्र पालटलं नाही, तर पाच जागतिक विक्रमही आपल्या नावावर नोंदवले.
कर्णधार आयुष म्हात्रेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशी आणि ॲरॉन जॉर्ज यांच्या जोडीपैकी जॉर्ज लवकर बाद झाला. त्यानंतर वैभवने कर्णधार आयुषच्या साथीने भारतीय डाव सावरत आक्रमक पण संयमी फलंदाजीचं दर्शन घडवलं.
वैभवने सुरुवातीला परिस्थिती ओळखून खेळ करत ३२ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर मात्र त्याने गिअर बदलला. अवघ्या ५५ चेंडूंमध्ये शतक आणि ७२ चेंडूंमध्ये दीडशतक झळकावत त्याने इंग्लंडच्या गोलंदाजांवर अक्षरशः वर्चस्व गाजवलं. द्विशतकाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच तो १७५ धावांवर बाद झाला. त्याच्या खेळीत १५ चौकार आणि १५ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट २१८.७५ इतका प्रभावी राहिला.
अंतिम सामन्यात शतक करणारा तिसरा भारतीय
अंडर–१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा वैभव हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला. याआधी उन्मुक्त चंद आणि मनजोत कालरा यांनी ही कामगिरी केली होती. मात्र, या दोघांच्या तुलनेत वैभवचं शतक सर्वाधिक वेगवान ठरलं.
वैभवचे पाच जागतिक विक्रम
या ऐतिहासिक खेळीसह वैभव सूर्यवंशीने पाच विक्रम आपल्या नावावर केले-
अंडर–१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात शतक करणारा सर्वात युवा फलंदाज
अंडर–१९ विश्वचषकात सर्वात वेगवान शतक (५५ चेंडू)
अंतिम सामन्यात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज
एका अंडर–१९ विश्वचषक हंगामात सर्वाधिक षटकारांचा विक्रम
अंडर–१९ वनडे क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण करणारा पहिला फलंदाज
आयपीएलमध्ये लक्षवेधी कामगिरी केल्यानंतर जागतिक व्यासपीठावर अंतिम सामन्यात केलेली ही खेळी वैभव सूर्यवंशीच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली आहे. भारतीय क्रिकेटला भविष्यासाठी एक नवा तारा मिळाल्याचं या खेळीनं अधोरेखित केलं.


