मुंबई प्रतिनिधी
पुणे आणि मुंबई या राज्यातील दोन प्रमुख शहरांमधील प्रवासाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग मिळताना दिसत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे–मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प पुढील पाच वर्षांत पूर्ण करण्याची स्पष्ट ‘डेडलाईन’ जाहीर केली असून, पीक अवर्समध्ये दर १५ ते २० मिनिटांनी ट्रेन उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्पोत्तर पत्रकार परिषदेत बोलताना वैष्णव यांनी सांगितले की, मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालय ‘मिशन मोड’मध्ये काम करत आहे. बुलेट ट्रेनसारखे मोठे प्रकल्प पाच वर्षांत, तर मध्यम स्वरूपाचे प्रकल्प तीन वर्षांच्या कालमर्यादेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने पुणे–मुंबई हायस्पीड मार्गाचे काम पहिल्या टप्प्यात वेगाने सुरू झाले असून, आगामी पाच वर्षांत हा मार्ग प्रत्यक्ष प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे गाड्यांची वारंवारता. प्रवाशांची मोठी संख्या लक्षात घेता ‘मेट्रो-स्टाईल’ नियोजन करण्यात आले आहे. “केवळ ट्रेन धावणार नाही, तर ती सहज उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पीक अवर्समध्ये दर १५ ते २० मिनिटांनी बुलेट ट्रेन सोडण्याचा आमचा विचार आहे,” असे वैष्णव यांनी स्पष्ट केले. यामुळे प्रवाशांना वेळेचे बंधन राहणार नाही आणि लोकलप्रमाणेच नियमित सेवा उपलब्ध होईल, असा दावा रेल्वे मंत्रालयाकडून करण्यात आला आहे.
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी २३,९२३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, राज्यात सध्या सुमारे १.७० लाख कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प विविध टप्प्यांवर प्रगतीपथावर आहेत. पुणे–मुंबई हायस्पीड कॉरिडॉरमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल, तसेच या मार्गालगत औद्योगिक व निवासी विकासाला चालना मिळेल, असा रेल्वे मंत्रालयाचा अंदाज आहे.
दर १५ मिनिटांनी उपलब्ध होणाऱ्या सेवेमुळे पुणे आणि मुंबईमधील कनेक्टिव्हिटी जागतिक दर्जाची होईल आणि आर्थिक, सामाजिक देवाणघेवाणीला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


