पुणे प्रतिनिधी
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा परिसरात प्रोपोलिन गॅस टँकर उलटून सुमारे २१ तास उलटून गेले तरीही वाहतूक अद्याप पूर्ववत झालेली नाही. या अपघातामुळे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, हजारो प्रवासी तासनतास अडकून पडल्याने मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे.
परिस्थिती नियंत्रणात न आल्याने राज्य परिवहन महामंडळाने पुण्यातून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व एसटी बस फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे आणि बोरीवलीकडे जाणाऱ्या बसेस पुढील काही तासांसाठी रद्द राहणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.
मागील जवळपास २२ तासांपासून प्रवाशांचे हाल सुरू असून, अनेक वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना अन्न व पाण्याविना ताटकळत बसावे लागत आहे. उष्णतेमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठीही प्रवाशांना संघर्ष करावा लागल्याचे दिसून आले.
काल दुपारी साडे चारच्या सुमारास उलटलेल्या गॅस टँकरमधून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती. त्याचे पडसाद तब्बल ५० किलोमीटरपर्यंत पसरलेल्या वाहनांच्या रांगांमधून उमटत आहेत.
दरम्यान, टँकर हटवणे, गॅस गळती पूर्णपणे थांबवणे आणि वाहतूक सुरळीत करण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या कठीण परिस्थितीत काही स्थानिक सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवकांनी पुढाकार घेत अडकलेल्या प्रवाशांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. या मदतीमुळे अनेकांना दिलासा मिळाला असून, संकटाच्या काळात माणुसकीचे दर्शन घडल्याची भावना प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर पुढील निर्णय जाहीर केला जाईल, असे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


