नवी दिल्ली:
२०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. मेरीलेबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) ने क्रिकेटच्या एकूण ७३ कायद्यांमध्ये सुधारणा जाहीर केली असून, हे नवे नियम येत्या ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. खेळ अधिक न्याय्य, सुरक्षित आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आल्याचे एमसीसीने स्पष्ट केले आहे.
महिला आणि कनिष्ठ क्रिकेटपटूंकरिता चेंडूच्या आकारात बदल करण्यात आला असून, आता क्रिकेट चेंडू तीन वेगवेगळ्या आकारांत उपलब्ध असणार आहे. प्रौढ पुरुष क्रिकेटसाठी आकार-१, तर महिला आणि मुलांसाठी वेगळे आकार निश्चित करण्यात आले आहेत. महिला व मुलांच्या हाताचा आकार लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, बॅटच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ओपन-एज क्रिकेटमध्ये लॅमिनेटेड बॅटना वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तीन लाकडी तुकड्यांपासून बनवलेल्या या बॅटना कामगिरीत कोणताही अतिरिक्त फायदा देत नसल्याचे एमसीसीने स्पष्ट केले आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर अजूनही एकाच लाकडी तुकड्यापासून बनवलेल्या बॅटनाच वापरल्या जातील.
दिवसाच्या खेळातील शेवटच्या षटकासंदर्भातही महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. शेवटच्या षटकात विकेट पडली तरी उर्वरित चेंडू टाकले जातील, अशी तरतूद करण्यात आली आहे. यामुळे गोलंदाजी करणाऱ्या संघाला होणारा संभाव्य अन्याय टळणार आहे.
फलंदाजांकडून जाणूनबुजून अपूर्ण धावा घेऊन फायदा मिळवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी, अशा परिस्थितीत कोणता फलंदाज स्ट्राईकवर असेल हे क्षेत्ररक्षक संघ ठरवू शकेल, असा नियम स्पष्ट करण्यात आला आहे.
सीमारेषेजवळील झेलांबाबतही नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. आता एखाद्या क्षेत्ररक्षकाला झेल परत मैदानात ढकलण्याची फक्त एकच संधी मिळणार आहे. वारंवार सीमारेषेबाहेर उडी मारून चेंडू खेळात ठेवणे बेकायदेशीर ठरणार आहे.
याशिवाय, ओव्हरथ्रोची व्याख्या बदलण्यात आली असून, स्टंपवर फेकलेला चेंडू थांबवण्याचा प्रयत्न न केल्यासच तो ओव्हरथ्रो मानला जाईल. चेंडू रोखण्याचा प्रयत्न झाला आणि तरीही तो पुढे गेला, तर तो मिसफील्ड ठरेल.
चेंडू ‘सेटल’ झाल्याची व्याख्याही अधिक स्पष्ट करण्यात आली आहे. चेंडू थेट गोलंदाज किंवा विकेटकीपरकडे गेल्यावरच नव्हे, तर एखाद्या स्थिर क्षेत्ररक्षकाकडे पोहोचल्यावरही तो सेटल मानला जाऊ शकतो.
विकेटकीपरच्या स्थितीबाबतच्या नियमात बदल करताना, चेंडू टाकण्याआधी कीपरचे हात स्टंपसमोर असले तरी तो नो-बॉल ठरणार नाही, मात्र चेंडू टाकल्यानंतर हात पूर्णपणे स्टंपच्या मागे असणे आवश्यक असेल.
हिट विकेटच्या व्याख्येतही सुधारणा करण्यात आली आहे. फलंदाज किंवा त्याच्या उपकरणाने क्षेत्ररक्षकाला स्पर्श केल्यानंतर स्टंप पडल्यास तो हिट विकेट ठरणार नाही. मात्र, इतर कोणताही अडथळा नसताना शॉट खेळताना स्टंप लागल्यास तो हिट विकेटच मानला जाईल.
तसेच, रन आऊट किंवा स्टंपिंग वैध ठरण्यासाठी चेंडू पूर्णपणे क्षेत्ररक्षक किंवा विकेटकीपरच्या हातात असणे आवश्यक असल्याचे एमसीसीने स्पष्ट केले आहे.
हे सर्व बदल खेळातील स्पष्टता वाढवणारे आणि वादग्रस्त प्रसंग टाळण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत क्रिकेट तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


