मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मंगळवारी (ता. ३) जाहीर केलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) निकालाने राज्यातील शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ उडवली आहे. एकूण ४ लाख ४६ हजार ७३० परीक्षार्थींमधून केवळ ५० हजार ३६९ उमेदवार (११.२८ टक्के) उत्तीर्ण झाले असून तब्बल ३ लाख ९६ हजार ३२५ भावी शिक्षक अपयशी ठरले आहेत. अत्यंत कमी उत्तीर्णतेमुळे शिक्षक भरती, शिक्षणाचा दर्जा आणि परीक्षेच्या स्वरूपाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पेपरनिहाय चित्र
इयत्ता पहिली ते पाचवीसाठीच्या पेपर एकसाठी १ लाख ९० हजार ९०१ उमेदवार बसले होते. त्यातील केवळ २१ हजार ८९२ उमेदवार उत्तीर्ण झाले असून १ लाख ६८ हजार ९९३ जण नापास झाले.
तर इयत्ता सहावी ते आठवीसाठीच्या पेपर दोनमध्ये २ लाख ५५ हजार ८२९ उमेदवारांपैकी २८ हजार ४७७ जणच पात्र ठरले असून २ लाख २७ हजार ३३२ जणांना अपयश स्वीकारावे लागले आहे.
माध्यमनिहाय अत्यल्प टक्केवारी
पेपर एकमध्ये मराठी माध्यमाचा निकाल १२.०२ टक्के तर इंग्रजी माध्यमाचा अवघा ५.४४ टक्के लागला आहे. उर्दू (६.९६), हिंदी (१२.१९), कन्नड (१५.०१) आदी माध्यमांचाही निकाल समाधानकारक म्हणता येणार नाही.
पेपर दोन (गणित-विज्ञान) आणि सामाजिकशास्त्र या दोन्ही विभागांतही बहुतांश माध्यमांचा निकाल एक अंकी टक्केवारीतच राहिला आहे. काही माध्यमांत तर एकही उमेदवार उत्तीर्ण न झाल्याचे चित्र आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची छाया
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानंतर राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील दीड लाखांहून अधिक शिक्षकांवर टीईटीची सक्ती लागू झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या ५३ वर्षांपर्यंत वय असलेल्या शिक्षकांनाही टीईटी देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दोन वर्षांच्या मुदतीत टीईटी उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांवर सक्तीची सेवानिवृत्ती लागू होणार असल्याने शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या टीईटी परीक्षेला ५० हजारांहून अधिक सेवेत असलेले शिक्षक बसले होते. मात्र, त्यातील मोठ्या संख्येने शिक्षक अपयशी ठरल्याचे समोर आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत असून, या कालावधीत आणखी चार टीईटी परीक्षा होणार आहेत. या सर्व परीक्षांत संबंधित शिक्षकांना उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
३६ उमेदवारांचा निकाल राखीव
टीईटी परीक्षेत गुण वाढवून देऊन पास करून देण्यासंदर्भातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी मुरगुड (जि. कोल्हापूर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या संशयावरून ३६ उमेदवारांचे निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने तात्पुरते राखून ठेवले आहेत.
यामध्ये पेपर एकमधील १६ आणि पेपर दोनमधील २० उमेदवारांचा समावेश आहे. तसेच एका प्रश्नाच्या उत्तरावरून उमेदवारांनी घेतलेल्या आक्षेपांवर अंतिम निर्णय येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे.
टीईटीच्या या निकालाने राज्यातील शिक्षक भरती धोरण, प्रशिक्षणाची गुणवत्ता आणि परीक्षेची पातळी याबाबत गंभीर पुनर्विचाराची गरज असल्याचे चित्र पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


