पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची पुणे व बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय तात्काळ अमलात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर नव्या नियुक्तीची प्रतीक्षा होती. आता शासनाने हा निर्णय जाहीर केल्याने दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, तो डिजिटल स्वाक्षरीसह प्रमाणित करण्यात आला आहे.
अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तसेच उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी होती. २८ जानेवारी रोजी त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर ही पदे रिक्त झाली होती. त्यानंतर अजित पवार यांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवन येथे चौथ्या दिवशी झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर या नियुक्तीबाबत राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
दरम्यान, पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी करून सुनेत्रा पवार यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. या नियुक्तीमुळे दोन्ही जिल्ह्यांतील विकासकामे व प्रशासकीय निर्णयप्रक्रियेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


