मुंबई प्रतिनिधी
मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि प्रवाशांची वाढती गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने चार नवीन १२ डब्यांच्या (नॉन-एसी) लोकल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. या नव्या फेऱ्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवांची एकूण संख्या १४०६ वरून १४१० इतकी झाली आहे.
कांदिवली आणि बोरीवली दरम्यान सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यामुळे या अतिरिक्त लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. सहावी मार्गिका कार्यान्वित झाल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या स्वतंत्र मार्गावर वळवण्यात आल्या असून, त्याचा थेट फायदा उपनगरीय लोकल सेवांना झाला आहे. परिणामी लोकल गाड्यांचे वेळापत्रक अधिक सुटसुटीत होण्यास मदत मिळणार आहे.
स्लो मार्गावर धावणार चार नवीन फेऱ्या
नवीन सुरू करण्यात येणाऱ्या चार उपनगरीय लोकल सेवा या ‘स्लो’ मार्गावर धावणार आहेत. यामध्ये दोन लोकल ‘अप’ दिशेला (चर्चगेटकडे) तर दोन लोकल ‘डाऊन’ दिशेला (उत्तर दिशेला) चालवण्यात येणार आहेत.
‘अप’ दिशेतील लोकल सेवा :
सकाळी ११.३९ वाजता – भाईंदर ते वांद्रे
दुपारी १२.१४ वाजता – भाईंदर ते चर्चगेट
‘डाऊन’ दिशेतील लोकल सेवा :
पहाटे ४.३० वाजता – वांद्रे ते भाईंदर
दुपारी १.२१ वाजता – वांद्रे ते भाईंदर
या सर्व लोकल गाड्या १२ डब्यांच्या नॉन-एसी स्वरूपातील असून नियमित प्रवाशांसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
वेळापत्रकात किरकोळ बदल
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नव्या चार फेऱ्या वेळापत्रकात सामावून घेण्यासाठी काही विद्यमान लोकल गाड्यांच्या वेळांमध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचे अधिकृत ॲप, संकेतस्थळ किंवा स्थानकांवरील वेळापत्रक फलक तपासावेत, असे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.
सहाव्या मार्गिकेच्या कार्यान्वयनामुळे भविष्यात आणखी लोकल फेऱ्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, प्रवाशांची गर्दी कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


