मुंबई प्रतिनिधी
खार पश्चिम परिसरात एका इमारतीतील रिफ्युजी रूममध्ये कचऱ्याच्या पिशवीत टाकलेली नवजात बालिका आढळून आल्याने खळबळ उडाली. खार पोलिस ठाण्यातील निर्भया पथकाने तातडीने हस्तक्षेप करत बालिकेला रुग्णालयात दाखल केल्यामुळे तिचे प्राण वाचले आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
शुक्रवारी सकाळी ओम निर्माण इमारतीतील रहिवासी वरुण रहेजा यांनी १४ व १५ व्या मजल्याच्या मधील रिफ्युजी रूममध्ये कचऱ्याच्या पिशवीत नवजात बाळ असल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच खार पोलिस ठाण्यातील निर्भया अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शीतल मेंगडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पाहणीदरम्यान बालिका जिवंत असल्याचे निदर्शनास आले. तिला तात्काळ कपड्यात गुंडाळून भाभा रुग्णालय, बांद्रा (पश्चिम) येथे दाखल करण्यात आले.
पोलिस तपासात या प्रकरणातील धक्कादायक बाब समोर आली आहे. ओम निर्माण इमारतीच्या १५ व्या मजल्यावर राहणाऱ्या एका कुटुंबाकडे घरकाम करणाऱ्या २० वर्षीय तरुणीने पहाटे सुमारे चारच्या सुमारास बालिकेला जन्म दिल्याची कबुली दिली आहे. अविवाहित असल्यामुळे सामाजिक भीतीपोटी बाळाचा त्याग केल्याचे तिने पोलिस चौकशीत सांगितले. प्रसूतीनंतर तिची प्रकृती खालावल्याने तिलाही भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी खार पोलिसांनी संबंधित तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे अविवाहित मातांसाठी उपलब्ध असलेल्या सामाजिक व वैद्यकीय सहाय्य व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.


