फलटण प्रतिनिधी
“दादांसोबत केवळ एक नेता नाही, तर त्यांची सावलीही हरपली,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विदीप जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले. अजित पवार यांच्या निधनासोबतच त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांचाही दुर्दैवी अंत झाल्याने राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. बुधवारी फलटण तालुक्यातील तरडगाव येथे जाधव कुटुंबीयांची भेट घेताना सुनेत्रा पवार यांचाही कंठ दाटून आला.
२८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह विदीप जाधव यांचे निधन झाले. कर्तव्यावर असताना प्राण गमावलेल्या विदीप जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करताना सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी विदीप यांच्या वृद्ध आई-वडिलांसह कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते. “दादा गेले आणि त्यांच्यासोबत त्यांचा विश्वासू सहकारीही गेला. हे दुःख शब्दांत मावणारे नाही,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
विदीप जाधव हे केवळ अंगरक्षक नव्हते, तर अजित पवार यांच्या प्रत्येक प्रवासात आणि प्रत्येक कार्यक्रमात ते सावलीसारखे सोबत असायचे. अनेक वर्षे निष्ठेने सेवा बजावणाऱ्या जाधव यांच्या साधेपणाची आणि शिस्तप्रियतेची आठवण यावेळी अनेकांनी सांगितली.
राज्यस्तरीय नेत्याचा अंगरक्षक असूनही विदीप जाधव विटावा येथील ‘श्रीकृष्ण विहार’मध्ये साध्या भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. शेजाऱ्यांच्या मते, अत्यंत शांत, मनमिळाऊ स्वभाव आणि कायम हसतमुख चेहरा हीच त्यांची ओळख होती. कामाचा ताण कितीही असला तरी कर्तव्याशी तडजोड त्यांनी कधीच केली नाही, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आपल्या गावातील युवक राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा अंगरक्षक असल्याचा तरडगावला अभिमान होता. मात्र आज त्याच गावावर शोककळा पसरली आहे. जाधव कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होताना शासन आणि पवार कुटुंब त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभे राहील, असा दिलासा सुनेत्रा पवार यांनी दिला.


