नवी दिल्ली वृत्तसंस्था
भारतीय रेल्वेतील नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी दिलासादायक बातमी आहे. रेल्वे भरती मंडळाकडून (RRB) तब्बल २१,९९७ ग्रुप डी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, दहावी उत्तीर्ण उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे.
रेल्वे भरती मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर (rrbapply.gov.in) ३१ जानेवारीपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २ मार्च २०२६ आहे. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख ४ मार्च असून, अर्जामधील दुरुस्तीसाठी ५ ते १४ मार्चदरम्यान स्वतंत्र विंडो खुली राहणार आहे.
उमेदवारांना केवळ एका रेल्वे झोनसाठी अर्ज करता येणार असून, एकापेक्षा अधिक झोनसाठी अर्ज केल्यास तो बाद ठरवला जाणार आहे. मात्र, एका झोनमधील विविध पदांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नसून, एकाच अर्जात पदांची पसंती नोंदवता येणार आहे. एकदा निवडलेला झोन पुढे बदलता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या भरतीसाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ३३ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. ओबीसी प्रवर्गासाठी ३ वर्षे, तर अनुसूचित जाती-जमातींसाठी ५ वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात येणार आहे.
भरती प्रक्रिया संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पासून सुरू होईल. सीबीटी परीक्षा ९० मिनिटांची असून, एकूण १०० प्रश्न विचारले जाणार आहेत. यामध्ये सामान्य विज्ञान आणि गणित विषयातून प्रत्येकी २५, लॉजिकल रिझनिंगमधून ३०, तर चालू घडामोडींमधून २० प्रश्न असतील. सीबीटीमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना शारीरिक कार्यक्षमता चाचणीसाठी (पीईटी) बोलावले जाईल. त्यानंतर कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
पीईटीमध्ये पुरुष उमेदवारांना ३५ किलो वजन घेऊन १०० मीटर चालणे आणि ठरावीक वेळेत १००० मीटर धावणे आवश्यक आहे. महिलांसाठी वजन व वेळेचे निकष वेगळे असतील.
निवड झालेल्या उमेदवारांना लेव्हल-१ अंतर्गत १८ हजार रुपये मूळ वेतन देण्यात येणार आहे. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी अर्ज शुल्क ५०० रुपये असून, परीक्षा दिल्यानंतर त्यापैकी ४०० रुपये परत केले जाणार आहेत. अनुसूचित जाती-जमाती आणि महिला उमेदवारांसाठी शुल्क २५० रुपये असून, परीक्षा दिल्यानंतर संपूर्ण रक्कम परत मिळणार आहे.
रेल्वेतील मोठ्या प्रमाणावरील ही भरती तरुणांसाठी महत्त्वाची संधी मानली जात असून, इच्छुक उमेदवारांनी अर्ज करताना आधार व शैक्षणिक कागदपत्रांची माहिती अचूक भरावी, असे आवाहन रेल्वे भरती मंडळाकडून करण्यात आले आहे.


