पुणे प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याची बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. मुंबईहून बारामतीकडे येत असताना हा अपघात घडल्याचे प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर देशभरातून राजकीय नेते, कार्यकर्ते आणि समर्थक बारामतीकडे दाखल होत आहेत.
पवार कुटुंबावर कोसळलेल्या या आघातानंतर शरद पवार मुंबईहून बारामतीत पोहोचले असून सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीहून दाखल झाल्या आहेत. दरम्यान, अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज की उद्या, याबाबत दिवसभर चर्चा सुरू होती. मात्र कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की अंत्यसंस्कार आज होणार नसून उद्या होणार आहेत.
कुटुंबीयांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार असून त्याआधी अजित पवारांचे पार्थिव बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सध्या पार्थिव बारामतीतील रुग्णालयात ठेवण्यात आले असून मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
अजित पवारांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी राज्यभर पसरल्यानंतर बारामतीत समर्थकांची मोठी गर्दी जमली आहे. विद्या प्रतिष्ठान परिसरात अंत्यसंस्कारासाठी तयारी सुरू असून काठेवाडीतील त्यांच्या शेतातही पर्यायी तयारी केली जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेमके अंत्यसंस्कार कुठे होतील, याबाबत उत्सुकता कायम आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते बारामतीत दाखल झाले आहेत. राज्यपालही बारामतीत पोहोचल्याची माहिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीचीही शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने बारामतीत दाखल झाल्याने शहरात शोकाकुल, पण गजबजलेले वातावरण पाहायला मिळत आहे.


