मुंबई प्रतिनिधी
मुंबईत स्वतःचे हक्काचे घर असावे, हे स्वप्न अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे वर्षानुवर्षे जपत असतात. वाढते घरभाडे, गगनाला भिडलेल्या घरांच्या किमती आणि मर्यादित पर्याय यामुळे हे स्वप्न अनेकांसाठी दूरच राहिले आहे. मात्र, अशाच स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई म्हाडाकडून लवकरच सुमारे ३,००० घरांची लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) सार्वत्रिक निवडणुकांनंतरची आचारसंहिता संपताच म्हाडाच्या मुंबई मंडळाने घरांच्या सोडतीची प्रक्रिया वेगाने पुढे नेली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ मध्ये ही बहुप्रतिक्षित लॉटरी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये मुंबईतील विविध पुनर्विकास प्रकल्पांमधील घरांचा समावेश असणार आहे.
केवळ मुंबईपुरतीच ही संधी मर्यादित नसून, कोकण मंडळाकडूनही ठाणे, नवी मुंबई आणि विरार परिसरात सुमारे ४,००० घरांची लॉटरी काढण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) एकूण सुमारे ७,००० परवडणारी घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत प्रामुख्याने बी.डी.डी. चाळ पुनर्विकास प्रकल्प, पत्राचाळ (गोरेगाव) तसेच मोतीलाल नगर (गोरेगाव) येथील प्रकल्पांमधील घरांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही घरे बाजारभावाच्या तुलनेत जवळपास निम्म्या किमतीत उपलब्ध होत असल्याने, दरवर्षी या सोडतीकडे अर्जदारांचा मोठा ओघ असतो.
म्हाडाच्या स्थापनेपासूनच्या ७६ वर्षांच्या प्रवासात आतापर्यंत सुमारे ९ लाख घरांची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत केवळ घरे बांधण्यापेक्षा त्या परिसरात रस्ते, पाणीपुरवठा, वीज आणि अन्य मूलभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे मार्चमध्ये अपेक्षित असलेली ही लॉटरी सर्वसामान्यांसाठी मोठी संधी ठरणार असून, पुन्हा एकदा ‘म्हाडाचं घर’ मिळवण्याचं स्वप्न अनेकांच्या डोळ्यांत साठून राहिलं आहे.


