सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात अनैतिक संबंधांच्या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते गोणीत भरून शेततळ्यात व नदीत फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे. सोमंथळी गावात घडलेल्या या थरारक घटनेमुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मृत तरुणाचे नाव सतीश उर्फ आप्पा दादासो दडस (वय २७) असे असून, प्रेमसंबंधातील गुंतागुंतीतून त्याचा काटा काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस तपासानुसार, एका महिलेशी सतीशचे प्रेमसंबंध होते. मात्र त्याच महिलेला पूर्वीचा प्रियकर तसेच नवरा असल्याने संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर महिलेने तिच्या नवऱ्याच्या आणि पूर्वीच्या प्रियकराच्या मदतीने सतीशची हत्या केल्याचा आरोप आहे.
आरोपींनी सतीशला दगडाने ठेचून ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने लाकूड कापण्याच्या मशीनचा वापर करून मृतदेहाचे तुकडे केले. हे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे गुन्ह्याचा छडा लावला.
या प्रकरणी संबंधित महिला, तिचा नवरा आणि प्रियकर अशा तिघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. प्रेमसंबंधांच्या त्रिकोणातून घडलेल्या या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


