नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाच्या १२ व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली. पक्षाच्या मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याची औपचारिक घोषणा करण्यात आली. यानंतर नितीन नबीन यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले. जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या. भाजपा ही कार्यकर्ताकेंद्रित विचारसरणीवर उभी असलेली संघटना असून, ‘शून्यापासून शिखरापर्यंत’चा प्रवास हीच तिची ओळख असल्याचे मोदी यांनी यावेळी नमूद केले.
“नेतृत्व परंपरेतून घडते, अनुभवातून समृद्ध होते आणि जनसेवा-राष्ट्रसेवेच्या भावनेतून संघटना पुढे जाते,” असे सांगत मोदी यांनी भाजपाच्या सर्व माजी राष्ट्रीय अध्यक्षांचे योगदान गौरविले. संघटन विस्ताराबरोबरच कार्यकर्त्यांच्या घडणीवरही पक्षाचा तितकाच भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान असलो, तरी आधी आणि आजही मी भाजपाचा कार्यकर्ता आहे. आज नितीन नबीन माझे बॉस आहेत,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले.
नितीन नबीन यांच्यासमोर केवळ भाजपाच नव्हे, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) सर्व घटक पक्षांशी समन्वय साधण्याचे मोठे आव्हान असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले. पुढील २५ वर्षे देशासाठी निर्णायक असून, याच काळात ‘विकसित भारत’ हे लक्ष्य साध्य करायचे आहे, असे त्यांनी नमूद केले. नितीन नबीन हे मिलेनियल पिढीचे प्रतिनिधी असून, आधुनिक तंत्रज्ञानासह काम करणाऱ्या नव्या पिढीचे नेतृत्व ते करतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
यापूर्वी नितीन नबीन यांनी झंडेवाला मंदिर, भगवान वाल्मीकि मंदिर, प्राचीन हनुमान मंदिर आणि गुरुद्वारा बंगला साहिब येथे जाऊन दर्शन घेतले होते. वयाच्या ४५व्या वर्षी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारणारे नितीन नबीन हे पक्षातील सर्वात तरुण अध्यक्ष ठरले आहेत. याआधी अमित शहा यांनी ४९व्या वर्षी हे पद भूषविले होते. सोमवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अन्य कोणत्याही उमेदवाराने नामांकन न भरल्यामुळे नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली. १४ डिसेंबर २०२५ रोजी त्यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.


