बारामती प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपा परिसरात एका तरुणीची अत्यंत निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खैरेपाडळ परिसरात रस्त्यालगत नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मृतदेहाची अवस्था पाहता हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून, घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सुपा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचा ताबा घेत पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला.
या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. घटनास्थळावरून आवश्यक नमुने गोळा करून त्यांची तपासणी सुरू आहे.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादर यांनी सांगितले की, आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच विशेष पथके नेमण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक साधनांच्या मदतीने तपास वेगाने सुरू असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्व शक्य त्या दिशेने तपास केला जात आहे.
या घटनेमुळे बारामती तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात असून, नागरिकांकडून आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


