गोवा प्रतिनिधी
उत्तर गोव्यातील मोरजी आणि हरमल परिसरात घडलेल्या दोन रशियन महिलांच्या निर्घृण हत्यांनी संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणातील संशयित रशियन नागरिक आलेक्सेई लिओनोव याने पोलिस चौकशीत केलेल्या दाव्यांमुळे तपासाला गंभीर आणि गुंतागुंतीचे वळण लागले आहे. गोव्यासह हिमाचल प्रदेशात मिळून तब्बल १५ महिलांचे खून केल्याचा त्याचा दावा तपास यंत्रणांसाठी आव्हान ठरत आहे.
पेडणे तालुक्यातील बामनभाटी-हरमल येथे ३५ वर्षीय रशियन महिला एलिनाचा गळा चिरून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर काही तासांतच मोरजी येथे आणखी एका रशियन महिलेचा मृतदेह आढळून आला. मोरजी येथील एका घराच्या बाथरूममध्ये ३७ वर्षीय एलिना वानिवा हिचा नग्न अवस्थेत गळा चिरलेला मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
मांद्रे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयित आलेक्सेई याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने या दोन्ही हत्यांची कबुली दिली असून, चौकशीदरम्यान त्याने आणखी १५ महिलांचे खून केल्याचा दावा केल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. मात्र आरोपीची विधाने विसंगत आणि वारंवार बदलणारी असल्याने या दाव्यांची शहानिशा करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी पैशांच्या लालसेपोटी विशेषतः रशियन महिलांना लक्ष्य करत होता. आधी मैत्री, त्यानंतर प्रेमाचे आमिष आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करून तो महिलांकडून पैसे उकळत असे. संबंधित महिला इतर व्यक्तीच्या संपर्कात असल्याचा संशय निर्माण झाल्यास तो टोकाचे पाऊल उचलत असल्याचे तपासात समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. रशियन नागरिक वास्तव्यास असलेल्या खोल्या, घरे आणि लॉजेसची तपासणी करण्यात येत असून, आरोपी नेमका कुठे वास्तव्यास होता, याचाही माग काढला जात आहे. तसेच, त्याच्या दाव्यांच्या अनुषंगाने हिमाचल प्रदेश पोलिसांशीही समन्वय साधण्यात आला आहे.
मांद्रे पोलीस निरीक्षक गिरेंद्र नाईक यांनी सांगितले की, “सध्या दोनच मृतदेह सापडले आहेत. आरोपीकडून मिळणारी कबुली पूर्णपणे सुसंगत नाही. तरीही सर्व शक्यता गृहीत धरून तपास सुरू आहे.” आरोपीच्या दाव्यांमुळे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून, या प्रकरणाकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे.


