अकोला प्रतिनिधी
फळबाग योजने संदर्भात तक्रार केल्यावर पाहणी करण्यासाठी आलेल्या तालुका कृषी अधिकाऱ्याने चित्रफित काढणाऱ्या शेतकऱ्याला चक्क बुटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी गावात मंगळवारी दुपारी घडली.
शेतकऱ्याला बुटाने मारहाण, कृषी अधिकाऱ्यांचा प्रताप; कृषिमंत्र्यांचे पालकतत्व असलेल्या जिल्ह्यातच… https://t.co/2jrmCKw8Ui #Farmer #govt #officer #fight pic.twitter.com/puFZlGdVDf
— LoksattaLive (@LoksattaLive) January 13, 2026
कृषिप्रदान समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील कृषिमंत्र्यांचे पालकत्व असलेल्या वाशीम जिल्ह्यातील ही निंदनीय घटना आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. ऋषिकेश पवार असे तरुण शेतकऱ्याचे, तर सचिन कांबळे असे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे नाव आहे.
वाशीम जिल्ह्याच्या मंगरुळपीर तालुक्यातील गोगरी, हिरंगी, खेर्डा बु. खुर्डा खु. येथील शेतकरी फळबाग गटापासून वंचित असल्याची तक्रार शेतकरी ऋषिकेश पवार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली होती. यावेळी सादर केलेल्या निवेदनात मागील सुमारे चार महिन्यांपासून नियुक्त कृषी सहाय्यक यांच्याकडून फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मानसिक व प्रशासकीय त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद केले.
गावांतील १५ फळबाग उत्पादक शेतकरी लाभार्थ्यांचे रोजगार हमी योजनेंतर्गत गट काढण्यात आलेले नाहीत. परिणामी संबंधित शेतकरी शासनाच्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. नवनियुक्त कृषी सहाय्यक रुजू झाल्यापासून फळबाग करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागले, हे अत्यंत अन्यायकारक असल्याचा आरोप तक्रारीत केला. शेतकऱ्यांचे प्रलंबित गट तत्काळ काढून देण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातूनदीला आहे.
शेतकऱ्यांच्या या पवित्र्यानंतर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे, कृषी सहाय्यक कृषी विभागाने इतर अधिकारी व कर्मचारी मंगळवारी गोगरी गावात दाखल झाले. यावेळी ते एका शेतात फळबागेची पडताळणी करून शेतकऱ्याशी चर्चा करीत होते. यावेळी ऋषिकेश पवार यांनी त्याचे चित्रिकरण केले. त्यावर तालुका कृषी अधिकारी संतापले.
शेतकरी व अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. कृषी अधिकाऱ्यांनी रागाच्या भरात पायातील बुट काढून शेतकऱ्याच्या अंगावर धावून गेले. बुटाने शेतकऱ्याला मारण्यास सुरुवात केली. असे चित्रफितीमध्ये दिसत असून समाजमाध्यमातून ती चांगलीच प्रसारित होत आहे. हे प्रकरण मंगरुळपीर पोलीस ठाण्यात पोहोचले. दोन्ही बाजूने हे प्रकरण आपसात मिटवण्यात आल्याची माहिती आहे.
अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करा – स्वाभिमानी शेतकरी संघटना
न्याय मागणाऱ्या शेतकऱ्याला अधिकाऱ्याने बुटाने मारहाण करण्याची घटना अत्यंत निंदनीय आहे. संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना धडा शिकवेल, असा इशारा संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी दिला.
तालुका कृषी अधिकारी म्हणतात, ‘महिला अधिकाऱ्यांशी असभ्य वर्तन’
या संदर्भात मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले, ‘संबंधित व्यक्तीने कृषी सहाय्यक महिला अधिकाऱ्याला मानसिक त्रास दिला. असभ्य वर्तन केले. संबंधित व्यक्तीने सातत्याने त्रास देत होता. मंगरुळपीर पोलीस ठाण्यात हे प्रकरण आपसात मिटवण्यात आले आहे.’
निवेदन दिल्याचा राग
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे फळबाग संदर्भात निवेदन दिल्याने कृषी अधिकारी संतापले होते. त्यातच ते पाहणी करीत असतांना चित्रफित काढल्याने त्यांनी रागाच्या भरात मारहाण केली, असा आरोप शेतकरी ऋषिकेश पवार यांनी केला.


