मुंबई प्रतिनिधी
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रशासन मतदार सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्नशील असताना, जुहू परिसरातील सुमारे ३५ हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे. जुहू रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरातील जवळपास २०० इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी हा निर्णय घेतला असून, प्रत्येक सोसायटीच्या प्रवेशद्वारावर त्याबाबतचे बॅनर झळकले आहेत.
या परिसरात मिलिटरी रडार असल्यामुळे पुनर्विकासावर मर्यादा येत असल्याचा दावा रहिवाशांकडून करण्यात येत आहे. गेल्या ३५ वर्षांपासून २०० हून अधिक इमारती आणि दोन झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडलेला असून, धोकादायक स्थितीतील घरांमध्ये राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर जवळपास ३५ हजार नागरिक भीतीच्या वातावरणात राहत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
नागरिकांनी त्यांच्या समस्या अनेकदा केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडे मांडल्या. मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आता मतदानावर बहिष्कार हा शेवटचा पर्याय निवडल्याचं सांगण्यात येत आहे.
बॅनरमधील मजकूर काय सांगतो?
बॅनरमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, SR0150 हा कायदा कालबाह्य असून, त्यामुळे नागरिकांची घरे उद्ध्वस्त होत आहेत. १९३९ च्या ब्रिटिशकालीन कायद्याअंतर्गत (१९७६ मध्ये अंमलात आणलेला) कायदेशीर घरांमधून नागरिकांना हाकलण्यात आलं आहे. सुमारे २०० इमारती आणि दोन मोठ्या झोपडपट्ट्या धोक्यात असून, ३५ हजार नागरिकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे मतदानापूर्वी शंभर वेळा विचार करा. आता खोटी आश्वासने चालणार नाहीत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी नेत्यांकडून प्रश्न सोडवण्याची आश्वासने देण्यात आली होती. मात्र निवडणुकांनंतर कोणीही दखल न घेतल्याचा आरोप करत, रहिवाशांनी यावेळी महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या घडामोडीनंतर प्रभाग क्रमांक ६८ मधील मनसे उमेदवार संदेश देसाई यांनी परिसरातील रहिवाशांची भेट घेतली. निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून या प्रश्नाचा पाठपुरावा करू आणि योग्य तोडगा काढू, असं आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलं आहे.
मतदानाच्या पूर्वसंध्येला उभ्या राहिलेल्या या आंदोलनामुळे जुहू परिसरातील राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे.


