मुंबई प्रतिनिधी
ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेनंतर अवघ्या एका दिवसात महायुतीची जाहीर सभा रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा झाली. मागील दिवसाच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण येण्याची शक्यता असतानाच, शिंदे यांनी विकासाचा अजेंडा मांडत अप्रत्यक्षपणे विरोधकांवर टीका केली.
एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेत भाषणाची सुरुवात केली. “शिवसेना आणि शिवतीर्थ यांचे अतूट नाते आहे. आजूबाजूला असलेल्या तिन्ही महापुरुषांच्या साक्षीने ही सभा होत आहे. ही केवळ प्रचारसभा नसून परिवर्तनाची सभा आहे,” असे ते म्हणाले. काल येथे झालेल्या सभेत टीका-टोमणे झाले, मात्र आम्ही त्याला उत्तर देणार नसून आमच्या कामाचा लेखाजोखा आणि पुढील पाच वर्षांची दिशा मांडणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. “फक्त विकास आणि विकास हाच आमचा अजेंडा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
तथापि, निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या सभांवरून शिंदे यांनी नाव न घेता मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टोला लगावला. “काही लोकांना केवळ निवडणुका आल्या की मराठी माणूस दिसतो. इतरवेळी नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स एवढंच कळतं,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. “यांच्याच काळात मराठी माणूस बाहेर फेकला गेला,” असा आरोपही त्यांनी केला. मराठी माणसाचे अस्तित्व कधीच धोक्यात नव्हते, आजही नाही आणि उद्याही राहणार नाही, असा दावाही शिंदे यांनी केला.
मुंबईच्या हिताचे रक्षण करण्यास आम्ही समर्थ आहोत, असे सांगताना शिंदे म्हणाले, “एकनाथ शिंदे मराठी नाही का? देवेंद्र फडणवीस मराठी नाहीत का?” तसेच, “२० वर्षांपूर्वी एकत्र का आला नाहीत? बाळासाहेबांची इच्छा असताना तेव्हा एकत्र आला नाहीत. आज मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आला आहात,” असे म्हणत ठाकरे बंधूंच्या युतीवरही त्यांनी निशाणा साधला.
महायुतीच्या या सभेत विकास, स्थैर्य आणि आगामी योजनांचा उल्लेख करण्यात आला असला, तरी विरोधकांवरील अप्रत्यक्ष टीकेमुळे शिवाजी पार्कवरील राजकीय वातावरण पुन्हा तापले असल्याचे चित्र दिसून आले.


