ठाणे प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना आरोप–प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होताना दिसत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ठाण्यातील संयुक्त सभेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आणि खळबळजनक आरोप केले.
उमेदवारी मागे घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या ऑफर दिल्या जात असल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर थेट आरोपांची तोफ डागली. “कुणाला १ कोटी, कुणाला ५ कोटी, कुणाला १० कोटी, तर कुणाला थेट १५ कोटींची ऑफर देण्यात आली आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“प्रचार थांबताच पैसे वाटप सुरू होईल”
सभा संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, “निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. उद्या प्रचार थांबेल आणि त्यानंतर घराघरांत पैसे वाटप सुरू होईल. आधीच काही ठिकाणी पैसे वाटायला सुरुवात झाली आहे. भाजपाचे लोक पैसे वाटत आहेत आणि शिंदेंच्या सेनेचे लोक ते पैसे पकडत आहेत. मग या सरकारमध्ये नेमकं काय चाललं आहे, हेच समजत नाही.”
कल्याण-डोंबिवली परिसराचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “मी नुकताच कल्याण-डोंबिवलीत फिरलो. तिथे प्रचंड वातावरण आहे. मात्र प्रचाराच्या अंतिम टप्प्यामुळे काही लोक आजच्या सभेला येऊ शकले नाहीत. आज तिथे घराघरांत पाच-पाच हजार रुपये वाटले जात आहेत. मग तुम्ही नेमका कोणता विकास केला? कल्याण-डोंबिवलीत गुलामांचा बाजार मांडला आहे.”
‘एकाच कुटुंबातील तीन उमेदवारांना १५ कोटींची ऑफर’
राज ठाकरे यांनी उमेदवारांना दिल्या जात असल्याच्या कथित ऑफर्सचा तपशील देताना सांगितले की, “एका प्रभागात एकाच कुटुंबातील तीन उमेदवारांना मिळून १५ कोटींची ऑफर देण्यात आली होती. मात्र त्या कुटुंबाने ही ऑफर नाकारली. एका महिला उमेदवाराला ५ कोटींची, तर दुसऱ्या एका उमेदवाराला १ कोटींची ऑफर देण्यात आली. म्हणजे कुणाला १, कुणाला ५, कुणाला १०, कुणाला १५ कोटी अशा पद्धतीने उमेदवारी मागे घेण्यासाठी व्यवहार सुरू आहेत.”
फडणवीसांवर टोलेबाजी
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही राज ठाकरे यांनी टीका केली. “देवेंद्र फडणवीस हे सगळं तुम्ही कुणासाठी करताय? हे सगळे फक्त ससाणे आहेत, जाऊन पक्षीच मारून आणायचे आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
गौतम अदाणी यांच्या संदर्भात सुरू झालेल्या चर्चेवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “मी अदाणींचं प्रकरण काढताच काही लोकांच्या मिरच्या झोंबल्या. मग माझा आणि अदाणींचा फोटो फिरवायला लागले. माझ्या घरी गौतम अदाणी आले होते, रतन टाटा आले होते, मुकेश अंबानी आले होते, कलाकारही आले होते. मग? माझ्या घरी आले म्हणून मी यांची पापं झाकायची का?”
“अदाणी दोन-तीन वर्षांपूर्वी घरी आले होते. आले म्हणजे काय करायचं? हाकलून द्यायचं का? शिवाय अदाणींशी दोस्ती करण्याइतका अडाणी मी नाही,” असा टोमणाही त्यांनी लगावला.
गुजराती समाजाविषयी स्पष्टीकरण
राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की, “आमचं गुजराती समाजाशी भांडण नाही. मात्र जे काही डाव रचले जात आहेत, त्याविरोधात इथल्या गुजराती समाजानेही बोललं पाहिजे.” अदाणी समूहावर टीका करताना त्यांनी सांगितले की, “नवी मुंबईचा विमानतळ सोडला, तर अदाणीने एकही विमानतळ बांधलेला नाही. जे विमानतळ घेतले आहेत, ते गन पॉईंटवर चालवायला घेतले आहेत. पोर्टच्या बाबतीतही हेच चित्र आहे.”
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आरोपांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे असून, महायुतीकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


