सोलापूर प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील केत्तूर गावात माणुसकीला काळिमा फासणारी, काळजाचा ठाव घेणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या सहा वर्षांच्या जुळ्या मुला–मुलीला शेतातील विहिरीत ढकलून निर्दयपणे त्यांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.
शिवांश जाधव आणि श्रेया जाधव अशी मृत जुळ्या भावंडांची नावे असून, सुहास जाधव (वय ३३) असे या निर्दयी वडिलांचे नाव आहे. सुहासने हिंगणी हद्दीतील आपल्या शेतात दोन्ही चिमुकल्यांना दुचाकीवर बसवून नेले आणि तेथे असलेल्या विहिरीत एकामागून एक ढकलून दिले. काही क्षणांतच दोन्ही निष्पाप जीव पाण्यात बुडून संपले.
घरच्यांना फोन, नंतर पलायनाचा प्रयत्न
प्राथमिक माहितीनुसार, घरगुती वाद किंवा मानसिक तणावातून रागाच्या भरात सुहासने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलांची हत्या केल्यानंतर सुहासने घरी फोन करून या कृत्याची माहिती दिली. त्यानंतर स्वतःही कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र तो दुचाकीवरून बार्शीच्या दिशेने पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करत पाठलाग सुरू केला. बार्शीपर्यंत आरोपीचा पाठलाग करून अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. विषबाधेचा परिणाम झाल्याने त्याला तत्काळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
शाळेत शोककळा
मृत शिवांश आणि श्रेया हे केत्तूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होते. नेहमी हसतमुख, अभ्यासात चांगली असलेली ही भावंडे अचानक कायमची हरपल्याने शाळेत शोककळा पसरली आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू तरळत होते.
नोकरी, शेती असूनही टोकाचा निर्णय
आरोपी सुहास जाधव हा झरे येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रात ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. जाधव कुटुंबाकडे बागायत शेतीही असल्याची माहिती आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट नसतानाही “आपल्या पश्चात मुलांचे काय होईल” या विकृत विचारातून त्याने हे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र यामागील नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
खुनाचा गुन्हा दाखल
दरम्यान, करमाळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेनुसार खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सुशिक्षित आणि जबाबदार पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलांवर असा अमानुष अत्याचार केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने समाजमन सुन्न झाले असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


