मुंबई प्रतिनिधी
देशात सध्या सुमारे ७८० भाषा व्यवहारात असताना, जागतिक माध्यम कंपन्यांच्या सोयीसाठी मोजक्याच भारतीय भाषांचे प्रमाणीकरण करण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू असल्याची गंभीर चिंता ज्येष्ठ पत्रकार व लेखक पी. साईनाथ यांनी व्यक्त केली. भविष्यात केवळ १४ भाषा वापरात राहतील, असे संकेत मिळत असून, हा केवळ भाषेचा नव्हे तर सांस्कृतिक अस्तित्वाचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर मराठी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असून, महाराष्ट्राने ठाकरे बंधूंना पाठिंबा द्यायला हवा, असे आवाहन साईनाथ यांनी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते विविध पत्रकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
माध्यमे आणि पत्रकारिता वेगळी झाली
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात साईनाथ म्हणाले की, आज माध्यमे आणि पत्रकारिता या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या आहेत. माध्यम कंपन्या नफ्याचा व्यवसाय बनल्या असून, आशयाऐवजी केवळ पोहोच वाढवण्यावर भर दिला जात आहे. सध्या ३२ टक्के माध्यम व्यवसाय डिजीटल कंपन्यांच्या ताब्यात असून, टीव्ही माध्यमालाही या क्षेत्राने मागे टाकले आहे. डिजीटल क्षेत्रावर अवघ्या चार मोठ्या कंपन्यांचा दबदबा असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘विश्वगुरु’ असलो तरी वास्तव वेगळे
“आपण स्वतःला विश्वगुरु म्हणवतो, मात्र अमेरिकेने लादलेल्या आयात करांवर चीनप्रमाणे साधा निषेधही करता येत नाही,” अशी टीका साईनाथ यांनी केली.
अमेरिकेच्या आयात करांमुळे महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग आणि कापूस उत्पादक शेतकरी यांना मोठा फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. कापसाला यंदा ८,५०० रुपये क्विंटल समर्थन मूल्य जाहीर असताना प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हाती ६,६०० रुपयेच पडत असल्याचे वास्तव त्यांनी मांडले.
देशाच्या जीडीपीपैकी २६ टक्के वाटा केवळ २१४ उद्योगपतींच्या हाती एकवटला असून, वाढती आर्थिक विषमता हा देशातील सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. या विषमतेविरोधात पत्रकारांनी ठामपणे लढा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सामाजिक योजनांवर घाव
‘लाडक्या बहिणींना’ आर्थिक मदत देण्यासाठी राज्यात अंगणवाड्यांचे खाजगीकरण आणि आशा वर्करच्या माध्यमातून मिळणाऱ्या ग्रामीण आरोग्य सुविधा बंद करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप साईनाथ यांनी केला. खाजगी अंगणवाडीचे पहिले प्रारूप नवी मुंबईत उभे करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
एआयचा वापर, पण मर्यादा हव्यात
प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर आवश्यक असला तरी, सर्जनशील लेखनासाठी माध्यमकर्मींनी एआयचा आधार घेऊ नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायी ठरलेली ‘इन्कलाब’ ही घोषणा आज देशद्रोही ठरवली जाते, ही स्थिती लोकशाहीसाठी धोकादायक असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
ठाकरे बंधूंना पाठिंबा का?
‘मराठी वाचवा’ ही चळवळ केवळ मराठी भाषेपुरती मर्यादित नसून, महाराष्ट्रातील सर्व बोलीभाषांचे जतन आणि संवर्धन हा तिचा गाभा असल्याचे साईनाथ यांनी स्पष्ट केले. राज्यात मराठीबरोबरच वारली, कोकणी, अहिराणी, खानदेशी अशा अनेक बोलीभाषा अस्तित्वात असून, त्या टिकवणे ही सामूहिक जबाबदारी आहे.
केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रामुळे स्थानिक भाषांवर दबाव येण्याची शक्यता असून, त्यामुळे भाषिक विविधतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतलेली त्रिभाषा धोरणविरोधी भूमिका ही भाषिक स्वाभिमान जपणारी आहे, असे साईनाथ यांनी ठामपणे सांगितले.
भाषा, संस्कृती आणि सामाजिक समतेसाठीचा हा लढा केवळ राजकीय नसून, लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांशी जोडलेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


