सोलापूर:प्रतिनिधी
राज्यातील खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांसह नगरपालिका, महापालिका शाळांमधील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा २० जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यावेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करण्यास सुरुवात होणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने भरती प्रक्रिया तातडीने सुरु करण्यासाठी पवित्र पोर्टल विकसीत करण्याचे काम तलिस्मा कार्पोरेट प्रा. लि. या कंपनीला दिले आहे.
राज्य शासनाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य अभ्यासक्रम आराखडा यापूर्वीच मंजूर केला आहे. आता पहिल्यांदा आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असून या वर्गांची पाठ्यपुस्तक निर्मिती पूर्ण झाली आहे. जानेवारीअखेर त्या पुस्तकांची छपाई सुरु होईल. मराठी शाळांमध्ये आता ‘सीबीएसई’प्रमाणेच अभ्यासक्रम असणार असून त्यादृष्टीने नियोजन पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पटसंख्या वाढावा, यासाठी पालकांचा कल लक्षात घेऊन सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु केले जाणार आहेत. दरम्यान, शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पटसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक आवश्यक आहेत.
नूतन शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच राबविला जाईल, असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार आता शालेय शिक्षण विभागाची कार्यवाही सुरु झाली आहे. जानेवारीअखेर जिल्हा परिषदांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल. त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये पात्र उमेदवारांकडून सेल्फ सर्टिफिकेट भरून घेतले जाईल आणि शेवटच्या टप्प्यात त्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यात गुणवत्तेनुसार संबंधित उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले .
पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतरही शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागांची भरती करण्यासाठी दुसरा टप्पा राबविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासाठी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने विचारणा होत आहे. त्यामुळे पदभरतीची तातडी असल्याने व पहिल्या टप्प्यात तलिस्मा कार्पोरेट प्रा. लि. कंपनीने चांगले काम केल्याचे विचारात घेऊन याच कंपनीस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल, त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या कंपनीला शासनाकडून ६८ लाख ८४ हजार १२० रुपये दिले जाणार आहेत.
शिक्षक भरतीची स्थिती
पहिल्या टप्प्यातील घोषणा
३०,०००
पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध
२१,६००
शिक्षक भरती झाली
१९,०००
दुसऱ्या टप्प्यातील भरती
१२,००० ते १५,००० पर्यंत
२० जानेवारीपासून पोर्टलवर जाहिराती अपलोड होतील
जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले असून २० जानेवारीपासून पवित्र पोर्टलवर रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल.


