पुणे प्रतिनिधी
पुणे शहरात मंगळवारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. सांगली पोलिस दलात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाने पुण्यातील एका लॉजमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शारीरिक व्याधीला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
डेक्कन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजमध्ये हा प्रकार घडला. सूरज मराठे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. अल्पवयातच पोलिस सेवेत प्रवेश मिळालेल्या मराठे यांची नियुक्ती २५व्या वर्षीच सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी झाली होती.
मराठे यांचे कुटुंब पुणे जिल्ह्यातील देहू येथे वास्तव्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांनी सांगली पोलिस दलातून रजा घेतली होती. गुडघ्याच्या आजारावर उपचार घेण्यासाठी ते अधूनमधून पुण्यात येत असत. यावेळीही उपचारासाठी पुण्यात आले असताना त्यांनी डेक्कन परिसरातील एका लॉजमध्ये मुक्काम केला होता.
मंगळवारी उपचारानंतर लॉजवर परतल्यानंतर त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खोलीची तपासणी केली असता सुसाईड नोट आढळून आली असून, त्यामध्ये शारीरिक आजारपणामुळे मानसिक तणाव वाढल्याचा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या घटनेमुळे पोलिस दलात आणि नातेवाइकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, सुसाईड नोटच्या आधारे अधिक माहिती घेतली जात आहे.


