मुंबई प्रतिनिधी
पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनसमधील पायाभूत सुविधांना मोठे बळ मिळाले असून, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांच्या देखभाल क्षमतेत लक्षणीय वाढ झाली आहे. येथे उभारण्यात आलेल्या तीन नव्या देखभाल मार्गिकांमुळे रेल्वेगाड्या उभ्या करण्यासाठी अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला असून, परिणामी प्रवाशांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी अधिक गाड्या चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
टर्मिनसवरील क्षमता वाढविण्याचा प्रकल्प
मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस येथे रेल्वे टर्मिनसची क्षमता वाढवण्यासाठी नव्या मार्गिका उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर सध्या वापरात असलेल्या मार्गांवरील फलाटांची लांबी वाढवण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. पश्चिम रेल्वेच्या जाळ्यातील जोगेश्वरी आणि वसई रोड येथे उभारण्यात येणारे नवे टर्मिनस अंतिम टप्प्यात पोहोचले आहेत.
वांद्रे टर्मिनसमध्ये यापूर्वी तीन देखभाल मार्गिका होत्या. मात्र, प्रवासी गाड्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याने आणखी तीन अत्याधुनिक मार्गिका उभारण्यात आल्या आहेत. या मार्गिकांवर रेल्वेगाड्या धुण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
२४ डब्यांच्या गाड्यांसाठी सुसज्ज सुविधा
नव्या मार्गिकांची लांबी प्रत्येकी ५४० मीटर असून, त्या २४ डब्यांच्या प्रवासी गाड्यांसाठी उपयुक्त आहेत. येथे एलएचबी (लिंके हॉफमन बुश), आयसीएफ तसेच अन्य सर्व प्रकारच्या डब्यांच्या देखभालीची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.
वांद्रे टर्मिनसमधील कोचिंग डेपोत सध्या सुमारे ८०० डब्यांची देखभाल केली जाते. एलएचबी डब्यांची नियोजित देखभाल दर ३६ महिन्यांनी, तर आयसीएफ डब्यांची देखभाल दर १८ महिन्यांनी केली जाते.
५३ कोटी ७६ लाखांचा खर्च
या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण ५३ कोटी ७६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या या कामातील पहिली मार्गिका जुलै २०२४ मध्ये कार्यान्वित झाली होती, तर उर्वरित दोन मार्गिकांचे काम डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण झाले. या नव्या मार्गिकांमुळे अतिरिक्त रेल्वेगाड्यांची हाताळणी करणे शक्य होणार असून, त्याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे.
राज्याला ९६ हँडहेल्ड एक्स-रे यंत्रांची भेट
दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि रुग्णकेंद्रित सेवा यांवर सविस्तर चर्चा झाली.
राज्यातील क्षयरुग्णांची एक्स-रे तपासणी वाढवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडून लवकरच महाराष्ट्राला ९६ अतिरिक्त हँडहेल्ड एक्स-रे यंत्रे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आबिटकर यांनी दिली. या यंत्रांमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील तपासण्या अधिक वेगाने आणि प्रभावीपणे होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


