मुंबई प्रतिनिधी
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संयुक्तपणे जाहीरनामा प्रसिद्ध करत निवडणूक रणधुमाळीला औपचारिक सुरुवात केली. शिवसेना भवनात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे बंधू एकत्र मंचावर आले. विशेष म्हणजे, जवळपास वीस वर्षांनंतर राज ठाकरे प्रथमच शिवसेना भवनात आले; त्या क्षणाला भावनिक संदर्भही लाभला.

पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी शिवसेना भवनाशी जोडलेल्या आठवणींना उजाळा दिला. तर उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक प्रक्रियेवर थेट हल्लाबोल केला. “देशात लोकशाही संपून झुंडशाही सुरू आहे. मतचोरी पकडल्यावर आता उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली आहे. बिनविरोध निवडणुकांसाठी जे काही घडत आहे, ते लोकशाहीच्या मुळावर घाव घालणारं आहे,” अशी टीका त्यांनी केली.
‘राहुल नार्वेकरांचे निलंबन करा’
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविषयी उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली. “आमदार अधिकारांचा दुरुपयोग होत आहे. अध्यक्ष कोणत्याही पक्षाच्या प्रचारासाठी जाऊ शकत नाहीत. हे उद्दाम वर्तन आहे. दमदाटी करून बिनविरोध निवडणुका घडवण्यात आल्या. मतदारांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गेला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा विषय गांभीर्याने घेऊन अध्यक्षांचे तात्काळ निलंबन करावे,” अशी मागणी त्यांनी केली. निर्णय प्रलंबित न ठेवता तात्काळ निकाल द्यावा, असे आव्हानही त्यांनी आयोगाला दिले.
उपहास, टोले आणि विकासावर टीका
“वरळीत सगळे ‘डोम कावळे’ जमले होते,” असा टोला लगावत उद्धव ठाकरेंनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. “आम्ही मुंबईत २५ वर्षांत कोस्टल रोड, मध्य वैतरणा धरण अशी ठोस कामे केली. पण मोदींनी तर कैलास पर्वतच बांधला आहे; गंगा स्वर्गातून आणली, अरबी समुद्र मिंध्यांनी निर्माण केला. हे सगळं का सांगत नाही?” असा उपहास त्यांनी केला. पाण्यातील शिवस्मारकाचा मुद्दा उपस्थित करत “समुद्रमंथन करून ते स्मारक बाहेर काढणार कधी?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘उद्या तक्रार करू नका’- राज ठाकरे
राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा देत सांगितले, “सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन येत नाही. आज जे पायंडे पाडले जात आहेत, उद्या सत्ताबदलानंतर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. महाराष्ट्राला यूपी-बिहारच्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. हे घातक आहे.” राजकारणातील दामदुपटी आणि विचारसरणी बदलण्याच्या प्रवृत्तीवर त्यांनी कडाडून टीका केली.
मराठी अस्मितेवर ठाम भूमिका घेत राज ठाकरे म्हणाले, “आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही. मुंबईत मराठीच महापौर होणार.” यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर देताना भाजपाला प्रश्न केला, “भाजपासाठी मराठी माणूस हिंदू नाही का?”
निवडणूक आयोगालाच आव्हान
करोना काळातील पुस्तकावर निवडणूक आयोगाने घातलेल्या बंदीवर उद्धव ठाकरेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्ही ते पुस्तक वाटणारच. निवडणूक आयोगाने हवं ते करावं; आम्हाला अडवण्याची हिंमत दाखवावी,” असे आव्हान त्यांनी दिले. भाजपाचा महापौर झाला, तर “मुंबईचं अदानीस्थान होईल,” अशी टीकाही त्यांनी केली.
संयुक्त सभा, निशाण्यावर ‘बालेकिल्ले’
ठाकरे बंधूंच्या संयुक्त प्रचारसभांना ५ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मुंबईत पश्चिम व पूर्व उपनगरांमध्ये आणि शिवाजी पार्क येथे तीन मोठ्या सभा नियोजित आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे यांचे बालेकिल्ले मानले जाणारे कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मीरा-भाईंदर येथे प्रत्येकी एक सभा होणार आहे. मनसेचा एकेकाळचा गड असलेल्या नाशिकमध्येही संयुक्त सभा होईल. संभाजीनगरात उद्धव ठाकरेंची स्वतंत्र सभा होणार असल्याची माहिती देण्यात आली.
स्टार प्रचारकांची यादी जाहीर
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे राज्यभर प्रचारसभा घेणार आहेत. संजय राऊत, भास्कर जाधव, अरविंद सावंत, सुषमा अंधारे यांचाही स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. ३ जानेवारीपासून प्रचारसभांचा धडाका सुरू होईल.
दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र
राज ठाकरे जवळपास वीस वर्षांनंतर शिवसेना भवनात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात विशेष चर्चा रंगली. मनसेची स्थापना झाल्यानंतर अनेकदा दोन्ही बंधूंनी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली होती; मात्र ती फिस्कटत राहिली. आता ठाम निर्धाराने ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.


