मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी (२ जानेवारी) संपली असून, या कालावधीत तब्बल ४५३ नामनिर्देशन पत्रे मागे घेण्यात आली आहेत. माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाले असून, आता १,७२९ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शनिवारी (३ जानेवारी) सकाळी ११ वाजेपासून उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, २३ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ११,३९१ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले होते. त्यापैकी अंतिम दिवशी म्हणजे ३० डिसेंबरपर्यंत २,५१६ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
या अर्जांची ३१ डिसेंबर रोजी छाननी करण्यात आली. त्यात १६४ नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले, तर २,१८५ अर्ज वैध घोषित करण्यात आले. वैध अर्जांपैकी आज झालेल्या माघारीनंतर ४५३ उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ अशी निश्चित करण्यात आली होती. या कालावधीत सर्व २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून माघारी नोंदविण्यात आल्या.
शनिवारी चिन्ह वाटप, अंतिम यादी जाहीर
शनिवारी, ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून उमेदवारांना अधिकृत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. चिन्ह वाटप पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी त्याच दिवशी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाने दिली.
विभागनिहाय चित्र
माघारीनंतरचे विभागनिहाय आकडे पाहता, एम पूर्व विभागात सर्वाधिक १२१ उमेदवार, तर आर मध्य विभागात सर्वात कमी ३५ उमेदवार निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून ४५३ माघारी झाल्या असून, मुंबईतील निवडणूक लढत आता अधिक स्पष्ट व थेट स्वरूपात जाणार आहे.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग आला असून, चिन्ह वाटपानंतर प्रचाराला अधिकच धार येण्याची शक्यता आहे.


