मुंबई प्रतिनिधी
राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा बुधवारी होणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दिली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई महापालिकेसाठी जागावाटपाबाबत चर्चा पूर्णत्वास आली असून, उर्वरित प्रक्रिया मंगळवारी रात्रीपर्यंत पार पडतील, असे राऊत यांनी सांगितले. मात्र, राज्यातील इतर महापालिकांबाबत युतीच्या चर्चांना अद्याप अंतिम स्वरूप आलेले नाही. त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर समन्वय सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबईपुरतीच ही युती मर्यादित राहणार की इतर शहरांमध्येही विस्तार होणार, या प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी युतीचा विस्तार स्पष्ट केला. मुंबई महापालिकेसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, पुणे आणि नाशिक या महत्त्वाच्या महापालिकांत शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली. इतर महापालिकांबाबत स्थानिक नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून, येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, बुधवारी दुपारी ठाकरे बंधूंची संयुक्त पत्रकार परिषद होणार असून, ही परिषद राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक ठरेल, असा दावा राऊत यांनी केला. या पत्रकार परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आले असून, त्यांनी उपस्थित राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील इतर राजकीय घडामोडींवर भाष्य करताना राऊत यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी अजित पवार यांनी युती केल्यास, त्यांना महायुतीत राहण्याचा नैतिक अधिकार उरणार नाही, असे ते म्हणाले. पुण्यात दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास, त्या ठिकाणी शिवसेना शरद पवार गटासोबत जाणार नाही, तर मनसेसोबत निवडणूक लढवेल. काँग्रेसलाही या आघाडीत सहभागी करून घेण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील काँग्रेससोबतच्या युतीबाबत विचारले असता, त्या चर्चेला जवळपास पूर्णविराम मिळाल्याचे राऊत यांनी संकेत दिले. मात्र, मुंबई वगळता इतर काही ठिकाणी काँग्रेससोबत युती व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.


