मुंबई प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘मेट्रो ७ अ’ प्रकल्पासाठी वळविण्यात आलेल्या २४०० मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीच्या छेद–जोडणीचे (क्रॉस कनेक्शन) महत्त्वाचे काम हाती घेतले आहे. हे काम २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून २६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेपर्यंत, म्हणजेच सुमारे ९९ तास चालणार आहे. या कालावधीत धारावी (जी उत्तर), अंधेरी पूर्व (के पूर्व) आणि वांद्रे पूर्व (एच पूर्व) या विभागांतील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेतही बदल होणार आहेत.
एमएमआरडीएच्या ‘मेट्रो ७ अ’ प्रकल्पासाठी अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या जलवाहिनीची छेद–जोडणी मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची असून, नियोजनबद्ध पद्धतीने व आवश्यक सुरक्षा निकषांचे पालन करून करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना पाणीपुरवठ्यात कमीतकमी अडथळा येईल, यासाठी पर्यायी व्यवस्था व नियोजन करण्यात आले असले तरी काही भागांत कमी दाबाचा पाणीपुरवठा अपरिहार्य ठरणार आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांतील नागरिकांनी आवश्यक त्या प्रमाणात पाण्याचा साठा करून ठेवावा, दुरुस्तीच्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा, तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
बाधित विभाग व बदललेली पाणीपुरवठ्याची वेळ
‘जी उत्तर’ विभाग (धारावी परिसर)
धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, जस्मिन मिल मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, ६० फूट व ९० फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर ढोरवाडा, महात्मा गांधी मार्ग आदी भागांत सकाळच्या पाणीपुरवठ्यावेळी २२ ते २५ डिसेंबरदरम्यान दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत कमी दाबाने पाणी मिळेल.
सायंकाळच्या पाणीपुरवठ्यात धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर आदी भागांत सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
‘के पूर्व’ विभाग (अंधेरी पूर्व)
कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ परिसर, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी. अॅण्ड टी. वसाहत येथे २२ ते २५ डिसेंबरदरम्यान दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणी मिळेल.
तसेच कोलडोंगरी, जुनी पोलिस गल्ली, विजय नगर (सहार रस्ता), मोगरापाडा परिसरात सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत कमी दाबाचा पाणीपुरवठा होणार आहे.
‘एच पूर्व’ विभाग (वांद्रे पूर्व)
वांद्रे–कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मोतीलाल नगर परिसरात २२ ते २५ डिसेंबरदरम्यान रात्री १० ते ११.४० या वेळेत कमी दाबाने पाणी मिळेल.
प्रभात वसाहत, टीपीएस-३, कलिना, विद्यापीठ परिसर, यशवंत नगर, सुंदर नगर, कोलिवरी गाव, तीन बंगला, गोळीबार मार्ग, खार भुयारी मार्ग ते खेरवाडी, नवापाडा, बेहराम नगर, ए. के. मार्ग, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) या भागांत २३ ते २५ डिसेंबरदरम्यान मध्यरात्री ३.३० नंतर ते सकाळी ९ या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
जलवाहिनी जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असे पालिका प्रशासनाने सांगितले असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


