नागपूर प्रतिनिधी
ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर राज्यसेवेत आपले स्थान निर्माण करणे ही नेहमीच प्रेरणादायी बाब ठरते. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथील चंदन कुटुंबीयांनी अशीच एक दुर्मिळ आणि अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे. या कुटुंबातील तिघे सख्खे भाऊ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) माध्यमातून अधिकारी झाले असून, राज्यभरात ही यशोगाथा चर्चेचा विषय ठरत आहे.
चंदन कुटुंबातील ज्येष्ठ बंधू दिलीप मालन चंदन सध्या नागपूर येथील गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची २०१० साली एमपीएससीमार्फत पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती. सुरुवातीला शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या दिलीप यांनी स्पर्धा परीक्षेचे आव्हान स्वीकारत प्रशासकीय सेवेत प्रवेश केला.
दुसरे बंधू विजय मालन चंदन यांची २०१२ साली पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाली. सध्या ते पुणे शहरात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीही प्रारंभी शिक्षक म्हणून सेवा बजावली होती; मात्र मोठ्या जबाबदाऱ्यांची ओढ आणि सेवाभावातून त्यांनी एमपीएससी परीक्षेचा मार्ग निवडला.
या दोन्ही भावांच्या पावलावर पाऊल टाकत तिसरे बंधू अजय मालन चंदन यांनीही आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली. नुकत्याच पार पडलेल्या संयुक्त गट ‘ब’ २०२४ परीक्षेत अजय यांची राज्य कर निरीक्षक (एसटीआय) पदी निवड झाली आहे. केडगाव (अहिल्यानगर) येथे राहून त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, उखलगाव येथून प्राथमिक शिक्षण, तर पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून समाजशास्त्र विषयात पदवी शिक्षण घेत अजय यांनी आपल्या स्वप्नांना दिशा दिली.
विशेष बाब म्हणजे, या तिन्ही भावांचे शिक्षण आणि घडण आईच्या कष्टातूनच शक्य झाली. आईने तिघांनाही शिक्षणाची संधी दिली आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. त्यामुळेच चंदन कुटुंबीयांचे यश हे केवळ वैयक्तिक नव्हे, तर संपूर्ण पंचक्रोशीसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
आपल्या यशाबद्दल अजय चंदन सांगतात, “पदवी शिक्षणापासूनच स्पर्धा परीक्षेचे ध्येय निश्चित केले होते. मोठ्या भावांचा आदर्श समोर होता. सातत्य, जिद्द आणि चिकाटी यांशिवाय यश शक्य नाही. योग्य नियोजन, वेळेचा सदुपयोग आणि कुटुंबाचा पाठिंबा यामुळेच हे यश मिळू शकले.”
तीन सख्खे भाऊ एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी होणे हे महाराष्ट्रातील दुर्मिळ उदाहरण मानले जात असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चंदन बंधूंची ही यशोगाथा निश्चितच नवी उमेद आणि प्रेरणा देणारी आहे.


