
मुंबई:प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असताना ही घटना घडली.
मध्यरात्री सैफसह त्याच्या कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत होते. सैफवर हल्ला झाल्यानंतर जेव्हा घरातील इतर सदस्य जागे झाले, तेव्हा चोर पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. सैफवर चोराने चाकूने हल्ला केला. त्याच्या शरीरावर एकूण सहा जखमा झाल्या आहेत.त्यापैकी दोन जखमा खोलवर झाल्या आहेत.
सैफ अली खानला मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमारास लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. एक जखम त्याच्या पाठीच्या कणाजवळ आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. लिलावती रुग्णालयातील न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि अॅनेस्थेटिस्ट निशा गांधी त्याच्यावर उपचार करत आहेत.
सैफवर चोराने चाकूहल्ला केला की त्याच्यासोबत झालेल्या झटापटीत सैफ दुखापत झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. चोराने चाकूने वार करत तिथून पळ काढला. या सर्व प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या वृत्तामुळे सैफ अली खानचे चाहते देखील चिंतेत पडले आहेत.
या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी अनेक पोलीस पथके देखील तयार करण्यात आली आहेत. या सर्व प्रकरणाचा आता कसून तपास केला जातोय.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनवरून सैफच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली. सैफची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं आहे. सैफ लवकरात लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना आता त्याचे चाहते करत आहेत.