नवी दिल्ली वृत्तसंस्था
महाराष्ट्रात २०१२ साली दोन वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीची दयेची याचिका राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी फेटाळली आहे. राष्ट्रपती भवनाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली. राष्ट्रपतिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मुर्मू यांनी फेटाळलेली ही तिसरी दयेची याचिका ठरली आहे.
या प्रकरणातील आरोपी रवी अशोक घुमारे याने ८ मार्च २०१२ रोजी जालना शहरातील इंदिरानगर परिसरात दोन वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळली होती.
प्रकरणाची सुनावणी करताना १६ सप्टेंबर २०१५ रोजी स्थानिक न्यायालयाने घुमारे याला फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०१६ मध्ये कायम ठेवली. त्यानंतर आरोपीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, ३ ऑक्टोबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयानेही फाशीची शिक्षा कायम ठेवत त्याची याचिका फेटाळली.
त्या वेळी तत्कालीन सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय खंडपीठाने निकाल देताना आरोपीच्या कृत्याला “माफीस पात्र नसलेले” असे संबोधले होते. न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरिमन यांनी निकालात नमूद केले होते की, आरोपीने आपल्या लैंगिक विकृतीपोटी सर्व सामाजिक, नैतिक आणि कायदेशीर मर्यादा ओलांडल्या. फुलण्याच्या आधीच एका निष्पाप मुलीचे आयुष्य संपवण्यात आले असून, हे कृत्य विश्वासघाताचे, सामाजिक मूल्यांच्या ऱ्हासाचे आणि अत्यंत क्रूर स्वरूपाचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
दरम्यान, मृत्युदंडाच्या प्रकरणांतील दया याचिकांबाबत नव्या कायद्यानुसार महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ अंतर्गत कलम ४७२ नुसार, १ जुलै २०२४ पासून मृत्युदंडाच्या प्रकरणात दया याचिका केवळ एकदाच दाखल करता येणार आहे. यापूर्वी फौजदारी प्रक्रिया संहितेत (सीआरपीसी) अशी स्पष्ट मर्यादा नव्हती.


