सांगली प्रतिनिधी
गावाकडच्या गोठ्यात म्हशी, गायी, बैल यांच्याच किंमती लाखांच्या घरात जातात, असा समज असताना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याच्या शेळीने हा सारा हिशेबच उलटा केला आहे. गोटखिंडी येथील दीपक नांगरे यांच्या संगोपनातील बिटल जातीच्या शेळीला तब्बल १ लाख १ हजार रुपयांचा विक्रमी दर मिळाल्याने संपूर्ण परिसरात आश्चर्य आणि कौतुकाची चर्चा रंगली आहे.

सामान्यतः शेळीपालन हे पूरक व्यवसाय म्हणून पाहिले जाते. मात्र नांगरे यांनी आपल्या शेळीचे संगोपन केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर जिव्हाळ्याने केले. संतुलित आहार, नियमित आरोग्य तपासणी आणि योग्य देखभाल यामुळे या बिटल शेळीची शरीरयष्टी उठावदार, कान टोकदार आणि रुबाब राजबिंडा झाला. परिणामी बाजारात तिची किंमत म्हशींपेक्षाही अधिक ठरली.
हा व्यवहार पाहण्यासाठी गोटखिंडी परिसरात अक्षरशः जत्राच भरली होती. एक शेळी इतक्या मोठ्या रकमेवर विकली जाते, यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. त्यामुळे व्यवहार प्रत्यक्ष पाहण्यासाठी तरुण, शेतकरी आणि पशुपालकांनी गर्दी केली. अखेर अवधूत चिखलगुट यांनी ही शेळी विकत घेतल्यानंतर हा ऐतिहासिक व्यवहार पूर्ण झाला.

साधारण ७० ते ८० हजारांपर्यंत चांगल्या म्हशीची किंमत असते. त्या तुलनेत या ‘व्हीआयपी’ शेळीने थेट लाखाचा टप्पा ओलांडत पशुपालन क्षेत्रात नवा मापदंड उभा केला आहे. या घटनेमुळे शेळीपालनालाही योग्य व्यवस्थापन आणि दर्जेदार संगोपन केल्यास मोठी आर्थिक संधी ठरू शकते, हे अधोरेखित झाले आहे.
एका रात्रीत मालामाल झाल्याची चर्चा जरी रंगली असली, तरी या यशामागे दीपक नांगरे यांची सातत्यपूर्ण मेहनत, कौशल्य आणि जिद्द दडलेली आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यात केवळ एका शेळीची नाही, तर आधुनिक शेतीकडे वळणाऱ्या तरुण शेतकऱ्याच्या यशोगाथेचीच चर्चा होत आहे.


