रायगड प्रतिनिधी
कोकण रेल्वे मार्गावर विनातिकीट प्रवासाचा वाढता कल रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोहिमा अधिक आक्रमक पद्धतीने राबवण्यास सुरुवात केली आहे. या कडक कारवाईचा परिणाम म्हणून केवळ नोव्हेंबर महिन्यातच ४२ हजार ९६५ फुकट्या व अनियमित प्रवाशांकडून तब्बल २ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यासाठी १,०७० विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या.
कोकण रेल्वेने गेल्या काही महिन्यांपासून “विनातिकीट प्रवासाला शून्य सहनशक्ती” या धोरणावर भर दिला आहे. प्रवाशांची सुरक्षा, नियमनबद्ध प्रवास आणि अधिकृत तिकीटधारकांना अडथळामुक्त सेवा देण्याच्या उद्देशाने तपासणी पथके दिवसरात्र कार्यरत आहेत.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या अकरा महिन्यांमध्ये कोकण रेल्वेने राबवलेल्या ७,४८३ विशेष मोहिमांमध्ये एकूण २ लाख ९० हजार ७८६ अनधिकृत व अनियमित प्रवासी सापडले. या काळात रेल्वे भाडे व दंड मिळून १७ कोटी ८३ लाखांची भक्कम वसुली झाली आहे.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, योग्य तिकिटाशिवाय प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा असून आगामी दिवसांत ही कारवाई अधिक तीव्र होणार आहे. विशेषत: हिवाळा, ख्रिसमस आणि नववर्षाच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मार्गावर तिकीट तपासणीच्या मोहिमा आणखी वाढवण्यात येणार आहेत.
प्रत्येक प्रवाशाने प्रवास सुरू करण्यापूर्वी वैध तिकीट खरेदी करणे हीच सुरक्षित व जबाबदार प्रवासाची पहिली पायरी असल्याचे कोकण रेल्वेकडून आवर्जून सांगण्यात आले आहे.


