मुंबई प्रतिनिधी
भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार सलामीवीर स्मृती मानधना आणि संगीत दिग्दर्शक पलाश मुच्छल यांचे लग्न अखेर रद्द करण्यात आले असून, याबाबतची अधिकृत घोषणा दोघांनीही रविवारी सोशल मीडियावरून केली. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत स्मृती आणि पलाश यांनी आपापल्या पोस्टमधून या निर्णयाची माहिती दिली.

स्मृतीने इंस्टाग्राम स्टोरीवर आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनावश्यक चर्चा सुरू असल्याचा उल्लेख करत, “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या आयुष्याबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. मला वाटते, आता हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आली आहे. लग्न रद्द झाले आहे.” असे स्पष्ट केले. गोपनीय आयुष्य जगण्याची इच्छा व्यक्त करत तिने पुढे लिहिले, “हा विषय इथेच थांबवावा. दोन्ही कुटुंबांच्या खासगी आयुष्याचा आदर करा. आम्हाला पुढे जाण्यासाठी थोडा वेळ द्या.”
भारतीय संघासोबतचा वर्ल्ड कप विजय, देशासाठी सर्वोच्च पातळीवर खेळण्याचे ध्येय आणि पुढील काळातही त्याच लक्षाने क्रिकेटमध्ये योगदान देण्याचा निर्धार – या सर्वांचा उल्लेख स्मृतीने आपल्या संदेशात केला. “तुमच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे. आता पुढे जाण्याची वेळ आहे.” असे ती म्हणाली.
दुसरीकडे, पलाश मुच्छलनेही आपली भूमिका जाहीर करत लिहिले, “मी माझ्या वैयक्तिक नात्याला मागे ठेवून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. निराधार अफवांमुळे काही पवित्र गोष्टींवर निर्माण होणारी बदनामी पाहणे अत्यंत कठीण होतं. हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अवघड काळ आहे, पण मी संयमाने परिस्थिती हाताळणार आहे.”
तो पुढे म्हणतो, “गॉसिपच्या आधारावर निर्णय घेण्याआधी समाजाने थांबायला शिकले पाहिजे. आपल्या शब्दांचा परिणाम किती तीव्र असू शकतो, याची लोकांना कल्पनाही नसते.” तसेच खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर त्याची टीम कठोर कारवाई करणार असल्याचेही त्याने जाहीर केले.
स्मृती आणि पलाश गेल्या सहा वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. अलीकडेच स्मृतीने २ नोव्हेंबर रोजी भारतीय संघासोबत महिला वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर पलाशने स्मृतीला प्रपोज केल्याचा व्हिडिओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. २३ नोव्हेंबर रोजी सांगलीत लग्नसोहळा होणार होता; पूर्वतयारीचे कार्यक्रमही पार पडले होते.
मात्र, लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने लग्न पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर पलाशच्या नावावर ‘फ्लर्टी चॅट’चे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आणि अफवांना उधाण आले. अखेर तीन आठवड्यांच्या शांततेनंतर दोघांनीही सोशल मीडियावरून अधिकृतपणे लग्न रद्द झाल्याची घोषणा केली.
दोन्ही पोस्टमधून एकच संदेश स्पष्ट जाणवला, “गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला पुढे जाण्याची संधी द्या.”


