नवी दिल्ली वृत्तसंस्था
केंद्रीय निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी आयोगाच्या निर्णयप्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आयोगातील कोणताही प्रशासकीय किंवा धोरणात्मक निर्णय एकमताने किंवा बहुमताने घेतला गेला नसेल, तर तो कायदेशीरदृष्ट्या टिकणारा नाही, असा दावा कुरेशी यांनी केला आहे. बहुसदस्यीय निवडणूक आयोगाच्या रचनेशी संबंधित १९९३ मधील कायदेशीर तरतुदींचाही त्यांनी संदर्भ दिला.
निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी आयोगाच्या निर्णयप्रक्रियेबाबत अनेक वेळा आक्षेप नोंदवल्याच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक तीव्र झाला आहे. आयोगाचे काही निर्णय कायद्याच्या चौकटीत नसल्याचे या आयुक्तांनी केंद्रीय सचिवांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.
कुरेशी यांच्या मते, १९९३ मध्ये बहुसदस्यीय निवडणूक आयोग अस्तित्वात आल्यानंतर निर्णय घेण्याची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली. त्यापूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांकडेच निर्णयाचे अंतिम अधिकार होते. मात्र, आयोगात अन्य आयुक्तांचा समावेश झाल्यानंतर निर्णय एकमताने घेणे अपेक्षित असून, एकमत शक्य नसल्यास बहुमताच्या आधारे निर्णय घेण्याची तरतूद करण्यात आली.
‘तिन्ही आयुक्तांना समान अधिकार’
आयोगातील तिन्ही आयुक्तांना समान अधिकार असल्याचे कुरेशी यांनी स्पष्ट केले. दोन आयुक्तांचे एकमत हे बहुमत मानले जाते. त्यामध्ये दोन निवडणूक आयुक्त असोत किंवा मुख्य निवडणूक आयुक्तांसह अन्य एका आयुक्ताचे मत असो, निर्णय बहुमताने घेतला जाऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
सध्याच्या प्रकरणात दोन्ही निवडणूक आयुक्तांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे दिसते. काही निर्णय घेताना त्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तसेच, काही कालावधीत आयोगाच्या बैठका झाल्या नसल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचा दावाही कुरेशी यांनी केला. या प्रकारावर त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, टी. एन. शेषण यांच्या कार्यकाळातही अशा स्वरूपाची परिस्थिती पाहायला मिळाली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, आयोगातील दोन आयुक्तांकडून निर्णयप्रक्रियेबाबत सातत्याने आक्षेप घेतले जात असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कामकाजातील पारदर्शकता आणि निर्णय घेण्याच्या पद्धतीवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.


