मुंबई प्रतिनिधी
वांद्रे पूर्व परिसरातील प्रवाशांसाठी दिलासादायक घडामोड. दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेला वांद्रे स्कायवॉक आता पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर असून येत्या १५ ते २० दिवसांत हा मार्ग नागरिकांसाठी खुला होणार आहे. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या परिसरातील वाहतूक कोंडी आणि पादचारी सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी स्कायवॉकच्या कामाची नुकतीच पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “हा प्रकल्प माझ्या निवडणूक जाहीरनाम्यातील एक महत्त्वाचा संकल्प होता. गेल्या काही महिन्यांपासून मी नियमित साइट भेटी घेतल्या, विधानसभेत आणि डीपीडीसीच्या बैठकीत हा मुद्दा सातत्याने मांडला. कामाला अपेक्षित गती मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. आता हे काम पूर्णत्वास येताना पाहून समाधान आणि अभिमान वाटतो.”
स्कायवॉक सुरू झाल्यानंतर वांद्रे न्यायालय, वांद्रे-कुर्ला संकुल, शासकीय वसाहत आणि परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. पादचारी, कार्यालयीन कर्मचारी तसेच परिसरात सतत ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी ही सुविधा अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
सरदेसाई यांनी पुढे सांगितले, “वांद्रे पूर्वसह आजूबाजूच्या सर्व भागांतील नागरिकांच्या सुरक्षित व सुलभ प्रवासासाठी हा स्कायवॉक महत्त्वाची भूमिका बजावेल. ही सुविधा उभारण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले आणि आता त्याचे फलित दिसू लागले आहे.”
वांद्रे परिसरातील वाढत्या पादचारी वाहतुकीला दिलासा देणारी ही सुविधा प्रत्यक्षात येणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.


