मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार स्पर्धा-२०२६’चा निकाल जाहीर झाला असून अंधेरी पश्चिम येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. विजेत्या मंडळाला ७५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.
घाटकोपर पश्चिम येथील “अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ‘भटवाडीचा राजा’ला द्वितीय क्रमांक मिळाला असून मंडळाला ५० हजार रुपये व सन्मानचिन्ह मिळणार आहे. तर करी रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला असून ३५ हजार रुपये व सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे.
यंदाच्या स्पर्धेत कांजूरमार्ग येथील शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला शाडू मातीच्या सर्वोत्कृष्ट गणेशमूर्तीचा पुरस्कार देण्यात आला आहे. विलेपार्ले येथील बाल गोपाळ मित्र मंडळाच्या ‘मुंबईचा पेशवा’ गणेशमूर्तीसाठी मयेकर यांना सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचा पुरस्कार जाहीर झाला. तसेच बोरिवली पूर्व येथील विघ्नहर्ता रहिवासी मित्र मंडळाच्या सजावटीसाठी रेश्मा शिंदे यांची सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार म्हणून निवड करण्यात आली.
अवयवदान जनजागृतीसाठी विक्रोळी पश्चिम येथील बालमित्र कला मंडळाला, तर पर्यावरण जनजागृतीसाठी दहिसर पूर्व येथील श्री श्रद्धा मित्र मंडळ आणि दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. गोरेगाव पश्चिम येथील बेस्ट नगर गणेशोत्सव मंडळ आणि मालवणी-मालाड येथील युवक उत्कर्ष मंडळाला उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहेत. आणखी १४ गणेशोत्सव मंडळांना विशेष प्रशस्तिपत्रके जाहीर करण्यात आली आहेत.
महापालिका मुख्यालयात बुधवारी २३ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. यंदा या स्पर्धेचे ३७ वे वर्ष असून एकूण ५० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेत मंडळांच्या देखाव्याची संकल्पना, पर्यावरणपूरक गणेशमूर्ती, सामाजिक व विधायक उपक्रम, परिसरातील स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, महापालिकेच्या विविध मोहिमांमधील सहभाग तसेच जनहिताचे संदेश आदी बाबींच्या आधारे परीक्षण करण्यात आले. प्राथमिक फेरी १७ व १८ सप्टेंबर, तर अंतिम फेरी १९ व २० सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली.


