हिंगोली प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आज राज्यभरात मतदान सुरू असताना हिंगोलीतील कळमनुरी येथे शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर यांच्याभोवती मोठा वाद निर्माण झाला आहे. मतदान केंद्रातच गोपनीयतेचा भंग व आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप बांगर यांच्यावर होत असून, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. प्रकरणाची दखल घेत हिंगोली शहर पोलिसांनी बांगर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी बाजार परिसरातील मतदान केंद्र क्रमांक ३ येथे सकाळी मतदानासाठी आलेल्या बांगर यांनी एका महिला मतदाराला ईव्हीएमवरील बटण दाबण्यास सांगितल्याचा आरोप आहे. याचदरम्यान ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’ तसेच ‘एकनाथ शिंदे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं’ अशा घोषणाबाजीसह मोबाइल फोनचा वापरही केल्याचा व्हिडिओ समोर आला. मतदान केंद्रातील अशा कृती मतदानाच्या गोपनीयतेचा भंग आणि निवडणूक आचारसंहितेचे उघड उल्लंघन मानल्या जातात.
व्हिडिओ समोर आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले होते. गोपनीयतेचा भंग झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष आल्यानंतर हिंगोली शहर पोलिसांनी बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या प्रकारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष बांगर यांना कठोर शब्दांत फटकारले. “लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची किमान चाड ठेवली पाहिजे. निवडणुकीत आपण कसं वागतो व कोणता संदेश देतो, याचा विचार करायला हवा,” असे फडणवीस म्हणाले.
संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत असतानाच गुन्हा दाखल झाल्याने शिंदे गटासाठीही ही मोठी धक्का मानला जात आहे.


