नांदेड प्रतिनिधी
नांदेड शहरात ‘मुलगा हवा’ या विकृत मानसिकतेतून एका २५ वर्षीय गर्भवती विवाहितेला जीव देण्यास प्रवृत्त केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांची मागणी, सततचा छळ आणि मुलगा होण्याच्या अट्टाहासाने हैराण झालेल्या प्रतीक्षा भोसले हिने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. तिच्या मृत्यूनंतर एका चिमुकलीचे मातृछत्र हिरावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
चार दिवसांपूर्वी विठ्ठलनगर येथे घडलेल्या या घटनेने नांदेड हादरून गेले आहे. प्रतीक्षा भोसले हिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती लक्ष्मण भोसले आणि तीन नणंदांवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छळाची पार्श्वभूमी
२०२३ मध्ये प्रतीक्षाचा विवाह लक्ष्मण भोसले याच्याशी झाला. लग्नावेळी साडेचार लाखांचा हुंडा देण्यात आला. सुरुवातीचा काही काळ सुखाचा वाटला; मात्र त्यानंतर लक्ष्मण हा दारूच्या नशेत प्रतीक्षेला मारहाण करू लागला. नणंदा माधुरी देशमुख, दीपाली देशमुख आणि भाग्यश्री देशमुख या फोनवरून शिवीगाळ करत दबाव टाकत असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
प्रतीक्षा हिला पहिली मुलगी झाल्यावर मुलगा हवा या हट्टापोटी छळ अधिकच वाढला. त्यातच स्कूल व्हॅन घेण्यासाठी पाच लाखांची मागणी करण्यात आली. मुलीच्या कुटुंबाने ५० हजार रुपये दिले, तरीही छळ थांबला नाही. दुसऱ्या गर्भधारणेदरम्यान मारहाणीमुळे प्रतीक्षाचा गर्भपातही झाला, तरी पती-नणंदेच्या वागण्यात बदल दिसला नाही.
शेवटचा टोकाचा निर्णय
सततच्या यातनेला कंटाळून प्रतीक्षाने २५ नोव्हेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूनंतर तिच्या लहान मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना शेजारी व नातेवाईक व्यक्त करत आहेत.
विमानतळ पोलिसांनी लक्ष्मण शंकरराव भोसले, माधुरी किशोर देशमुख, दीपाली रामराव देशमुख आणि भाग्यश्री सूरज देशमुख यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या हृदयद्रावक प्रकरणामुळे समाजातील ‘वंशाचा दिवा’ या जुनाट मानसिकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


