सातारा प्रतिनिधी
खंबाटकी घाटातील तीव्र उतार… दरीच्या काठाने वेगाने धावणारी एसटी… आणि अचानक ब्रेक निकामी! नेहमीप्रमाणे साधा प्रवास सुरू झालेला; पण क्षणभरात ४५ प्रवाशांचा जीव धोक्यात. मात्र चालकाच्या असामान्य प्रसंगावधानामुळे भीषण दुर्घटना टळली आणि प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.
स्वारगेट–सातारा मार्गावर धावणाऱ्या एम.एच.१४ के.क्यू. १३९३ या बसचा दुपारी साडेबाराच्या सुमारास खंबाटकी घाटात प्रेशर पाईप फुटून ब्रेक निकामी झाले. बसमध्ये वाहक नव्हता, ४५ प्रवासी मात्र होते. जीवघेण्या उतारावर बस वेगाने घसरू लागल्याचे लक्षात येताच चालक गोरक्षनाथ शंकर जाधव (वय ४९) यांनी अवघ्या काही सेकंदांत निर्णय घेत जीव वाचवणारी धडाडी दाखवली.
ब्रेक न लागल्याने बस कुठल्याही क्षणी दरीत कोसळण्याची भीती होती. हॅन्डब्रेक, गियर,सगळे उपाय निष्फळ. अशा परिस्थितीत जाधव यांनी बस दरीच्या डाव्या बाजूच्या लोखंडी सुरक्षा रेलिंगला घासत नेण्याचा मार्ग निवडला. तब्बल हजार फूट अंतर बस रेलिंगला घासत वेग कमी करत पुढील मातीच्या ढिगाऱ्याकडे वळवण्यात त्यांनी यश मिळवले आणि अखेर बस थांबली.
प्रवाशांसाठी हा जीवावरचा क्षण… मृत्यू डोळ्यांसमोरून गेल्याचा अनुभव… पण जीव वाचल्याचा दिलासा. बचाव झाल्यानंतर प्रवाशांनी चालक जाधव यांना खांद्यावर उचलून कृतज्ञता व्यक्त केली.
घटना घडल्यानंतर जाधव यांनी तात्काळ वरिष्ठांना मदतीसाठी संपर्क साधला; परंतु सातारा आगारातून कोणतीही मदत मिळाली नाही. अगदी आगार व्यवस्थापक शिंदे यांच्याशीही संपर्क साधता आला नाही. अखेर वाई एसटी स्थानकाचे आगार व्यवस्थापक युवराज कदम यांना संपर्क झाला. त्यांनी घटनास्थळी धाव घेत बसची पाहणी केली. चार वर्षांपूर्वीची ही बस असून प्रेशर पाईप फुटल्यानेच ब्रेक फेल झाल्याचे स्पष्ट झाले.
कदम यांनी चालकाच्या कौतुकास्पद धाडसाचे अभिनंदन केले; परंतु सातारा आगारातून वेळेवर मदत न मिळाल्याने चालक जाधव यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या चालकाच्या विलक्षण प्रसंगावधानामुळे खंबाटकी घाटातील एक गंभीर दुर्घटना टळली; मात्र एसटीच्या देखभाल व्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह कायम राहिले आहे.


