मुंबई प्रतिनिधी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या रणधुमाळीत अनपेक्षित वळण आले आहे. काही प्रभागांतील उमेदवारांच्या निधनामुळे राज्य निवडणूक आयोगाने संबंधित ठिकाणची निवडणूक तत्काळ स्थगित करण्याचे आदेश दिले असून, कार्यकर्त्यांत एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आरक्षण मर्यादा ओलांडल्याविषयी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल आज येण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय ठरेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अशा संवेदनशील पार्श्वभूमीवर आयोगाचा निर्णय अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे.
तीन प्रभागांतील निवडणुका थांबल्या
राज्यातील तीन वेगवेगळ्या प्रभागांमधील नगरसेवक पदाच्या निवडणुका उमेदवारांच्या निधनामुळे थांबवण्यात आल्या आहेत. अध्यक्षपदाच्या निवडणुकांवर कोणताही परिणाम झाला नसला तरी या निर्णयामुळे स्थानिक पातळीवरील निवडणूक प्रक्रियेवर तात्पुरता ब्रेक बसला आहे.
२ डिसेंबर रोजी मतदान आणि ३ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असताना हा निर्णय आल्यानं निवडणूक प्रचार, चिन्हवाटप आणि पक्षीय समीकरणांना अचानक थांबा बसला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील दोन ठिकाणच्या निवडणुका स्थगित
उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि धुळे जिल्ह्यातील दोन ठिकाणी निवडणुका स्थगित झाल्या आहेत.
नाशिक,’मनमाड नगरपालिका, प्रभाग क्रमांक 10
या प्रभागातील उमेदवार नितीन वाघमारे यांच्या निधनामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहेत.
धुळे – पिंपळनेर नगरपंचायत, प्रभाग क्रमांक 2 ब
भाजप उमेदवार कुसुमबाई पाथरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे या प्रभागातील निवडणूक तातडीने स्थगित करण्यात आली आहे.
बीडमधील गेवराई नगरपंचायतीतही स्थगिती
बीड जिल्ह्यातील गेवराई नगरपंचायत, प्रभाग क्रमांक 11 येथील उमेदवार दुरदानाबेगम सलीम फारुकी यांच्या निधनामुळे या प्रभागातील निवडणूकही थांबवण्यात आली आहे.
उमेदवारांच्या निधनामुळे निवडणुका स्थगित करण्याची तरतूद निवडणूक नियमांमध्ये असली तरी निवडणुकीच्या अगदी उंबरठ्यावर आलेली ही पावले राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहेत. आरक्षण विषयक न्यायालयीन निकाल आणि निवडणूक स्थगितीच्या आदेशाचा एकत्र परिणाम स्थानिक राजकारणाच्या आगामी चित्रावर होणार हे निश्चित मानले जात आहे.


