मुंबई प्रतिनिधी
मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील भायखला रेल्वे इन्स्टिट्यूटच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनेल तर परळ रेल्वे इन्स्टिट्यूटमध्ये मनसेसह इतर संघटनांसोबत युती करून विजयी झालेले भारतीय रेल कामगार सेनेचे उमेदवार आज मंगळवारी मातोश्रीवर दाखल झाले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत आगामी कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
या भेटीत रेल कामगार सेनेच्या विविध मागण्या आणि संघटनात्मक बळकटीकरणाबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या प्रसंगी शिवसेना नेते व सचिव तसेच रेल कामगार सेनेचे अध्यक्ष विनायक राऊत, शिवसेना उपनेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर, रेल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
रेल्वे कर्मचारी हितासाठी संघर्ष करताना मिळालेले यश हे संघटनशक्तीचे फलित असल्याचे ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.


