मुंबई प्रतिनिधी
मुंबईच्या प्रारूप मतदार यादीत तब्बल ११ लाख दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करीत “हे नेमकं कुणासाठी?” असा थेट सवाल काँग्रेस आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ही गंभीर बाब समोर आल्यानं राजकीय वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.
राज्यातील विविध महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून हालचाली वेगात सुरू आहेत. करोना आणि आरक्षण या दोन कारणांमुळे दीर्घकाळ रखडलेली निवडणूक प्रक्रिया ३१ जानेवारी २०२६ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
मतदार याद्यांवरून रणधुमाळी
राज्यातील नगर पंचायती व नगरपरिषदांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंतची मतदार यादीच ग्राह्य धरली जाणार आहे. या निवडणुकीत १ कोटी ७ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील, तर त्यांच्यासाठी १३,३५५ मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. निवडणूक ईव्हीएमद्वारेच होणार असून, मतदारांना मतदान केंद्र व स्वतःचे नाव शोधता यावे यासाठी स्वतंत्र मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
“दुबार नावे हटवा, मगच निवडणुका” विरोधकांचा आग्रह
प्रारूप यादीत आढळलेल्या प्रचंड दुबार नोंदींवरून विरोधकांनी कडक भूमिका घेतली आहे. दुबार नावे आधी हटवा आणि मगच निवडणुका जाहीर करा, अशी मागणी विविध पक्षांकडून करण्यात येत आहे.
निवडणूक आयोगाचे निर्देश
राज्य निवडणूक आयोगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना स्पष्ट आदेश देत म्हटले आहे की,
दुबार मतदारांची नावे शोधण्यासाठी बूथ स्तरावर विशेष मोहीम राबवावी.
आयोगाकडे दुबार नावे थेट हटवण्याचा अधिकार नसला तरी दोन ठिकाणी मतदान होऊ नये यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात.
दुबार नावे असलेल्या मतदारांची यादी तयार करून अशा व्यक्ती एकाच ठिकाणी मतदान करतील आणि दुबार मतदान होणार नाही, याची खातरजमा करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
मुंबईतील ११ लाख दुबार नोंदींचा मुद्दा उचलल्यानंतर राजकीय आरोप–प्रत्यारोपांना सुरूवात झाली असून निवडणुकीच्या तोंडावर या वादाचा परिणाम कसा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


