वसई प्रतिनिधी
वसईतील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत घडलेल्या संतापजनक घटनेत सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय आशिका गौंड हिचा मृत्यू झाला आहे. शाळेत 10 मिनिटे उशिरा पोहोचल्याच्या कारणावरून शिक्षकाने पाठीवर दप्तर घेऊन तब्बल शंभर उठाबशांची शिक्षा दिल्यानंतर आशिकाची प्रकृती बिघडली आणि आठ दिवसांच्या जीवघेण्या झुंजीनंतर शेवटी शुक्रवारी रात्री तिचा मृत्यू झाला. हा मृत्यूही योगायोगाने बालदिनाच्याच दिवशी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वसईपूर्व सातीवली येथील कुवरा पाडा परिसरातील ही शाळा प्रथम ते आठवीपर्यंतचे शिक्षण देते. 8 नोव्हेंबर रोजी अनेक विद्यार्थी उशिरा आल्यानंतर संबंधित शिक्षकाने सर्वांना 100 उठाबशांची शिक्षा दिली होती. आशिकाही त्यातच होती. घरी गेल्यावर तिची प्रकृती अचानक बिघडू लागली. तिला प्रथम आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण प्रकृती गंभीर होत गेल्याने तिला मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. अखेर आठ दिवसांच्या उपचारानंतरही आशिकाला वाचवता आले नाही.
पालकांचा संताप, शाळेला टाळे
या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेत धडक देत व्यवस्थापनाविरोधात जोरदार निषेध व्यक्त केला. “शाळेच्या हलगर्जीपणामुळेच आमच्या मुलीचा बळी गेला,” असा आरोप पालकांनी करत शाळेला टाळे ठोकले. दोषी शिक्षकावर गुन्हा दाखल होईपर्यंत शाळा उघडू देणार नाही, असा इशारा पालकांनी दिला आहे. वालीव पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
शिक्षण विभागही हलला
वसईचे गटशिक्षणाधिकारी पांडुरंग गलांगे यांनी घटनेची दखल घेत चौकशी सुरू केल्याचे सांगितले. “विद्यार्थ्यांना अशाप्रकारे शिक्षा देणे हा कायद्याने गुन्हा आहे. संपूर्ण चौकशी करून अहवाल शिक्षण विभागाला सादर केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वीही पालघरमधील भगिनी समाज विद्यालयात 13 वर्षीय विद्यार्थिनीला पाच मिनिटे उशीर झाल्याने 50 उठाबशांची शिक्षा देण्यात आली होती. त्यामुळे अशा शिक्षापद्धतींच्या धोकादायक परिणामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या दुर्दैवी घटनेने शिक्षणपद्धती, शालेय शिस्त व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर चर्चा पुन्हा एकदा पेटली आहे.


