नागपूर प्रतिनिधी
नागपूर येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) कॅम्पसमधील एक धक्कादायक घटनेने वैद्यकीय क्षेत्रासह पोलिस प्रशासनात खळबळ उडवली आहे. पुणे येथे कार्यरत असलेले सीआरपीएफचे डीआयजी व आयपीएस अधिकारी कृष्णकांत पांडे यांची २५ वर्षीय मुलगी समृद्धी पांडे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उशिरा उघडकीस आली.
समृद्धी एम्स नागपूर येथील त्वचारोग विभागातील प्रथम वर्षाची विद्यार्थिनी होती. शिव कैलाश परिसरातील मंजिरा अपार्टमेंटमध्ये ती एकटी राहत होती. मंगळवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास वडिलांनी फोन केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने संशय निर्माण झाला. त्यांनी तिच्या वर्गमित्राशी संपर्क साधत समृद्धीची चौकशी करण्यास सांगितले.
वर्गमित्र फ्लॅटवर पोहोचला असता दरवाजा आतून बंद होता. मागील बाजूने प्रवेश केल्यावर समृद्धी छताच्या पंख्याला लटकलेली अवस्थेत आढळली. तत्काळ पोलीसांना कळवण्यात आले. सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. “प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचे दिसत आहे. ती काही दिवस तणावाखाली असल्याची माहिती मिळते. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. तिच्या सहाध्यायांकडून अधिक माहिती घेत आहोत,” अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
समृद्धीच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी सखोल तपास सुरू केला असून वर्गमित्रांची discreet चौकशी सुरू आहे. या घटनेने एम्सच्या कॅम्पसमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


