मुंबई प्रतिनिधी
राज्याच्या न्यायव्यवस्थेला हादरवणारी घटना मुंबईत उघडकीस आली आहे. न्याय देणाऱ्या खुर्चीवर बसलेलेच न्यायाधीश भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकले असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माझगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयातील लिपिकाला १५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात न्यायाधीशांनीही रक्कम स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले असून, एसीबीने लिपिकासह अतिरिक्त सत्र न्यायाधीशांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
२५ लाखांची मागणी, १५ लाखांवर सौदा
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पत्नीच्या कंपनीच्या जागेसंदर्भात चालू असलेली केस माझगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयात होती. या प्रकरणात लिपिक चंद्रकांत हनमंत वासुदेव (वय ४०) याने तक्रारदाराशी संपर्क साधत, निकाल त्यांच्या बाजूने लावून देण्यासाठी थेट २५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी १० लाख रुपये स्वतःसाठी आणि उर्वरित १५ लाख रुपये न्यायाधीशांसाठी देण्याची मागणी वासुदेवने केली होती.
तक्रारदारावर वारंवार दबाव आणल्यानंतर त्यांनी अखेर एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर विभागाने पडताळणी केली असता वासुदेवने १५ लाख रुपयांची लाच घेण्यास सहमती दिल्याचे स्पष्ट झाले.
सापळा आणि रंगेहाथ अटक
११ नोव्हेंबर रोजी एसीबीने सापळा रचला. या कारवाईदरम्यान वासुदेवने तक्रारदाराकडून १५ लाख रुपये स्वीकारताच त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. अटकेनंतर त्याने थेट अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी (वय ५५) यांना फोन करून लाचेची रक्कम स्वीकारल्याची माहिती दिली.
न्यायाधीश काझी यांनीही या रकमेबाबत संमती दर्शवल्याचे एसीबीच्या तपासात समोर आले. त्यानंतर दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायाधीशांच्या अटकेसाठी परवानगीची मागणी
या प्रकरणात लिपिक वासुदेवला अटक करून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, न्यायाधीशांच्या अटकेसाठी आणि त्यांच्या निवासस्थानी झडतीसाठी आवश्यक परवानगी मागण्यात आली असून, ती मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
या प्रकरणामुळे न्यायव्यवस्थेतील प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. न्याय देणारेच लाचखोरीच्या जाळ्यात सापडल्याने, भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत आणखी एक काळी पानाची नोंद झाली आहे.


